दोन नव्या संघांसाठी ऑक्‍टोबरमध्ये लिलाव

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी दोन नवे संघ दाखल होणार आहेत. या दोन संघांसाठी निविदा मागवण्यात आल्या असून हा लिलाव पुढील महिन्यात होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. पुढील मोसमासाठी दोन नव्या संघांची निश्‍चिती करण्यासाठी येत्या 17 ऑक्‍टोबरला लिलाव होणार आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर दोनच दिवसांत हा लिलाव होणार आहे. 21 सप्टेंबरला नवीन संघांसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. 5 ऑक्‍टोबरपर्यंत कागदपत्रे सादर केले जातील आणि 17 ऑक्‍टोबरला लिलाव होईल. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर प्रत्येक संघाच्या वाट्याला 14 किंवा 18 सामने येतील.

पुढील मोसमापासून स्पर्धेच्या कालावधीत दहा संघांची दोन गटात विभागणी करून जास्त सामने खेळवण्यात येणार असून ज्या कंपनीचा टर्नओव्हर 3 हजार कोटी आहे त्याच कंपन्यांना या प्रक्रियेत सहभाग घेता येणार असल्याची अट बीसीसीआयने ठेवली आहे. एका संघाची मूळ किंमत 2 हजार कोटी रुपये असून लिलावातून दोन संघांकडून बीसीसीआयला तब्बल 5 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

दोन नव्या संघांसाठी गुवाहाटी, रांची, कटक, अहमदाबाद, लखनौ आणि धर्मशाला या शहरांच्या नावांची चर्चा आहे. दोन नवीन संघांच्या समावेशामुळे पुन्हा खेळाडूंचा लिलाव होईल. सध्या या स्पर्धेत खेळत असलेल्या 8 संघांना केवळ दोनच खेळाडू रीटेन करता येणार आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल आणि पुढील वर्षी जानेवारीत खेळाडूंचा लिलाव होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.