नीरजच्या प्रशिक्षकाची उचलबांगडी

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचे प्रशिक्षक उवे हॉन यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे सांगत भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या जागी नव्या दोन प्रशिक्षकांची नियुक्‍ती होणार असल्याचेही सांगितले गेले आहे. जर्मनीच्या उवे हॉन यांचा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंतच करार होता. 2017 साली भालाफेकपटू नीरज चोप्राला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. ऑलिम्पिकमध्ये नीरजला मार्गदर्शन करणारे क्‍लॉज बार्टोनिट्‌झ यांचा करार कायम राहील. आम्ही गोलाफेकपटू ऍथलीट ताजिंदरपाल सिंह तूरसाठीही परदेशी प्रशिक्षक नियुक्‍त करणार आहोत, असेही महासंघाने सांगितले आहे.

नीरजसह शिवपाल सिंह आणि अन्नू राणी यांनी हॉन यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास नकार कळवला होता. नीरज हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच एशियन गेम्स स्पर्धा हॉन यांच्या नेतृत्वाखाली खेळला होता. हॉन यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघावर टीका केली होती व त्यांच्या दडपणामुळे व हस्तक्षेपामुळे काम करणे अवघड असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याबाबत महासंघाला नाराजी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.