अतुल पवारसह सहाजणांवर दरोड्याचा गुन्हा

Madhuvan

सातारा/वडूज -विकत घेतलेला डंपरचे पैसे न देता त्याच मालकाकडून खंडणी वसूल करून त्याच्याच खिशातील पैसे जबरदस्ती चोरून नेल्याप्रकरणी खटाव तालुक्‍यात मानवाधिकाराचा बुरखा पांघरून उजळमाथ्याने फिरणाऱ्या संशयित अतुल बापूराव पवार (रा. उंबर्डे, ता. खटाव), निलेश गोरख जाधव, सचिन उर्फ टोमॅटो शिवाजी जाधव (दोघे रा. वडूज), सोमनाथ हिंदूराव साठे (रा. सिध्देश्‍वर कुरोली, ता. खटाव) या टोळीला वडूज पोलिसांनी गजाआड केले. तर अनोळखी दोघे फरारी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप चंद्रकांत शिंदे (रा. चिंचाळे, ता. आटपाडी) यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदे यांनी 2016 मध्ये शेतीकामासाठी डंपर (एमएच 10 एडब्लू 7481) त्यांच्या भावाच्या नावाने विकत घेतला. तो डंपर दि. 14 जानेवारी 2020 रोजी गणेश सातपुते (रा. वडूज) याला विकला होता. त्यावेळी सातपुते व शिंदे यांच्यात नोटरी करार झाला. त्यानुसार सातपुते याने तो डंपर 14 लाख 55 हजार रुपयाला खरेदी करून चार लाख 65 हजार रुपये डंपरवरील कर्जापोटी विटा येथील श्रीराम फायनान्स कार्यालयात भरले.

 बाकीचे पैसे एक महिन्याने देण्याची कबुली दिली. दरम्यान, सातपुते याने शिंदे यांना निलेश जाधव याच्या बॅंक खात्याचा धनादेश दिला. एक महिन्याची मुदत संपल्यानंतर शिंदे यांनी सातपुते याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने धंदा नसल्याचे कारण पुढे करून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध आटपाडी (जि. सांगली) पोलीस ठाण्यात तक्रार केली. 

त्या तक्रारीसाठी पोलिसांनी सातपुतेला बोलवले असतानाही निलेश जाधव व अतुल पवार हे दोघे गेले होते. त्यावेळी “तू गणेशवर तक्रार का केलीस,’ असे म्हणून त्या दोघांनी शिंदे यांना दमदाटी केली. तसेच तुझे पैसे पाहिजे असतील तर आम्हाला पन्नास हजार रुपये दे अन्यथा तुझे पैसे बुडतील, अशी धमकी दिली. पैसे बुडतील या भीतीपोटी शिंदे यांनी त्यांचा मित्र जीवन हिंदूराव भंडारी यांच्याकडून दहा हजार रुपये आणून जाधव व पवार यांना दिले. त्यानंतर राहिलेले 40 हजार रुपये वडूजला आणून दे, असे सांगून हे दोघे तिथून निघून गेले. 

फायनान्सवाले पैशासाठी तगादा लावत असल्याने पंधरा दिवसांपूर्वी सातपुते याला पैसे मागण्यासाठी शिंदे वडूज येथे आले होते. तेव्हा सातपुतेसोबत अतुल पवार, निलेश जाधव, सचिन जाधव, सोमनाथ साठे हे तिघे तिथे आले व 40 हजार रुपयांची मागणी करू लागले. माझेच पैसे वेळेत मिळत नसल्याने माझी परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे शिंदे यांनी अतुल पवार याला सांगितले. 

त्यावर मी कोण आहे, माहिती आहे का, पैसे दे अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन, अशी धमकी दिली तर निलेश जाधव याने कानफाटात मारून परत इकडे यायचे नाही अन्यथा मारून टाकण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले शिंदे गावाला निघून गेले होते. मात्र, फायनान्स कंपनीने पैशासाठी पुन्हा तगादा सुरू केल्याने दि. 25 रोजी शिंदे, त्यांचा भाऊ संदीप व मित्र अप्पा जाधव हे तिघे पैसे मागण्यासाठी वडूज येथे रात्री सव्वाआठ वाजता आले होते.

 यावेळी गणेश सातपुतेचा फोन लागत नसल्याने शिंदे यांनी निलेश जाधवला फोन करून गणेशच्या ठावठिकाणाबद्दल विचारणा केली. त्यावेळी तुम्ही कुठे आहे, असे जाधव याने विचारले असता, आम्ही वडूज एसटी स्टॅंडसमोर असल्याचे शिंदे यांनी जाधवला सांगितले. त्यानंतर काही वेळातच काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरमधून आलेल्या अतुल पवार, निलेश जाधव, सचिन जाधव, सोमनाथ साठे यांनी शिंदे यांना गोलाकार कडे करून धमकावण्यास सुरूवात केली. 

“तू आमचे 40 हजार रुपये कधी देणार,’ असे म्हणून संशयितांनी शिंदे यांच्या शर्टच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने चोरले व परत डंपरच्या पैशासाठी वडूजला आला तर मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.