राजगुरूनगर – खेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांना भाजपचीच उमेदवारी होती. जिल्हा आणि राज्याकडूनच देशमुख यांना उमेदवारी दिली होती, त्यासाठी पक्षाकडून निधी ही दिला होता. या निवडणुकीत गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली, असे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अतुल देशमुख यांच्या खांद्यावर पुन्हा खेड तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
राजगुरूनगर येथे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची शनिवारी (दि. 28) बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुका अध्यक्ष, चाकण शहर अध्यक्ष व पक्षातील काही तालुका पदांच्या नेमणुका करण्यात आल्या.त्यावेळी भेगडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संघटक सचिन सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली त्यात देशमुख यांनी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
यावेळी गटनेते शरद बुट्टे पाटील, प्रदेश सदस्य पांडुरंग ठाकूर, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, किरण झिंजुरके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, रामदास मेदनकर, संदीप सोमवंशी, विष्णू बोऱ्हाडे, मंगेश गुंडाळ, रामदास मुके, सचिन लांडगे, राजन परदेशी, देविदास बांदल यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी अतुल देशमुख (तालुका अध्यक्ष), अजय जगनाडे (चाकण शहर अध्यक्ष), अमोल धाडगे (कार्याध्यक्ष) यांना नियुक्तीपत्र दिले. आळंदी, राजगुरूनगरचा अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
खेड तालुक्यात चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यात गाव तिथं भाजप शाखा काढण्याची युवा मोर्चाची जबाबदारी आहे. पक्षातील 33 टक्के महिलांचा कोरम भरून काढून चांगल्या सदस्यांच्या माध्यमातून महिलांचे नेटवर्क तालुक्यात उभे करून पक्ष संघटन बळकट केली जाईल कार्यकर्त्याला न्याय देणाचे काम केले जाईल. गावात पावरफुल कार्यकर्त्याला ताकद देणार असून भाजप हाच आपला विचार आहे तो एक परिवार समजून सर्व मिळून
काम करू.
– अतुल देशमुख, नवनिर्वाचित अध्यक्ष, खेड तालुका, भाजप