बेल्हे (पुणे) – अणे (ता. जुन्नर) येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने अणे पठारावर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
अणे येथील पावर हाऊस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. अणे येथील जांभळदरा शिवारात विजय गणपत काळे या शेतकऱ्याच्या शेतावर नितीन शेटे हे त्यांचे वाटेकरी वास्तव्यास असतात. गुरुवारी (दि. 3) रात्री आठच्या सुमारास त्यांच्या पत्नी वर्षा नितीन शेटे ह्या घरासमोर भांडी घासत असताना संभेराव वस्तीच्या दिशेने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वीज गेलेली असल्याने बिबट्या जवळ येईपर्यंत त्यांना दिसला नाही. परंतु जवळ येत असलेला बिबट्या पाहून घाबरून गेल्याने त्यांनी आरडाओरडा करत घरात पळ काढला. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.
या भागात तीन ते चार बिबट्यांच्या सतत वावर असल्याचे येथील रहिवासी प्रकाश दाते यांनी सांगितले. तसेच आणे पठारावर रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वीज वितरण कंपनीने रात्रीचा वीज पुरवठा खंडित करू नये व वनविभागाने येथील बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, डॉ. दीपक आहेर, किशोर आहेर, रंगनाथ बेलकर यांनी केली आहे.