सातारा – हॉटेल व्यावसायिक व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या खटाव तालुक्यातील ललगुण येथील घरावर हल्ला करून चारचाकी वाहनासह चिकन सेंटरची तोडफोड केल्याच्या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ललगुण येथील गुरुकृपा हॉटेल लॉजवर बेकायदेशीर दारू विक्रीसह गैरप्रकार चालत असल्याने ते बंद व्हावेत यासाठी मुमताज मुलाणी यांनी वारंवार पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून गुरुकृपा हॉटेल व लॉजचे मालक बाळासाहेब माने, अजित माने, संभाजी माने, इंदुबाई माने, मेघा माने, मयूर माने यांच्यासह सुमारे दहाजणांनी दि. 18 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलाणी यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरासमोर उभे राहून घर व कार (एमएच 12 एचझेड 1927) व चिकन सेंटरची तोडफोड केली. याबाबत मुमताज मुलाणी व त्यांचे पती निवृत्त पोलीस अधिकारी हुसेन गुलाब मुलाणी यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेतील सर्व हल्लेखोर फरारी झाले आहेत.
मी शांत बसणार नाही : मुमताज मुलाणी
अनधिकृत व्यवसायांच्या विरोधात आवाज उठवणे, हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित करत एका निवृत्त पोलीस अधिकाराच्या घरावर हल्ला होऊनही पोलीस प्रशासन अद्यापही बघ्याच्या भूमिकेत आहे. वारंवार तक्रार देऊनही अनधिकृत व्यवसाय बंद झाले नाहीत. आज माझ्या घरावर भ्याड हल्ला केला असला तरी मी शांत बसणार नाही. ललगुण व परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रीच्या विरोधात भविष्यातही लढा आणखी तीव्र करणार आहे.
पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी : आ. शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मुमताज मुलाणी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि मी खंबीरपणे उभा असून हल्लाप्रकरणी पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली.
शस्त्राने वार केल्याप्रकरणी मुलाणी दांपत्यावर गुन्हा
बंगल्यासमोर गाडी रेस केल्याच्या कारणावरून मुमताज हुसेन मुलाणी व हुसेन गुलाब मुलाणी (रा. ललगुण ता. खटाव) यांनी मयूर माने याची मोटर सायकल अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची फिर्याद बाळासाहेब माने यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. या हल्ल्यामध्ये मयूर माने जखमी झाला असून त्याच्यावर पुसेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. फिर्यादीनुसार पुसेगाव- फलटण मार्गावर शिंदेवाडी फाटा येथे दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता मुलाणी दाम्पत्याने चिकन सेंटरच्या दुकानाजवळ मयूर माने याची मोटरसायकल रस्त्यात अडवून त्यास शिवीगाळ व दमदाटी केली. हुसेन मुलाणी यांनी चिकन सेंटरमधील लोखंडे धारदार वस्तूंनी मयूरच्या उजव्या हातावर वार केला. त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब माने गेले असता मुलाणी दांपत्याने फिर्यादीला ठार मारण्याची धमकी दिली.