नवीन वर्षापासून ग्राहकांसाठी बँकिंग सेवा महाग होणार आहे. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्तीचे शुल्क भरावे लागणार आहे. जूनमध्येच रिझर्व्ह बँकेने बँकांना मोफत मर्यादेनंतर शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती, जी नवीन वर्षापासून लागू होणार आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस, माचिस नंतर आता सर्वसामान्यांना एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे.
आरबीआयच्या मते, प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना रोख रक्कम आणि इतर वित्तीय सेवांसाठी दरमहा काही विनामूल्य मर्यादा सेट करते. विनामूल्य मर्यादेनंतर यापेक्षा जास्त बॅंकेच्या सेवा वापरण्यासाठी बँकांकडून शुल्क आकारण्यात येते.
रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, अधिक इंटरचेंज चार्जेस आणि खर्च वाढल्यामुळे बँकांना एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. आता अॅक्सिस, एचडीएफसीसह इतर सार्वजनिक आणि खासगी बँकांमधून पैसे काढल्यावर अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
दर महिन्याला आठ मोफत व्यवहार
बँकांकडून सध्या ग्राहकांना दर महिन्याला आठ मोफत व्यवहार देण्यात येत आहे. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश आहे. ज्या बॅंकेत ग्राहकाचे खाते आहे अशा ग्राहकांना एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार उपलब्ध आहेत. याशिवाय, मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून पाच विनामूल्य व्यवहार करता येतात. सध्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारले जातात, जे 1 जानेवारीपासून 21 रुपये होणार आहे. यावर सेवा कराच्या रूपात जीएसटीही भरावा लागेल.