नवी दिल्ली : करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने जगाची काळजी वाढवली आहे. त्यातच भारतात देखील या व्हेरियंटने एंट्री केली आहे. बंगळुरूमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असतानाच यात आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानच्या जयपूरमध्ये परतलेले एकाच कुटुंबातील चार जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजस्थानच्या जयपूर कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. यापैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना करोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांपैकी 5 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशात या व्हेरियंटने चिंता वाढवली असल्याचे दिसत आहे.
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. ओमायक्रॉनच्या दृष्टीने सर्वांनाच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. ते करोनाच्या कुठल्या व्हेरियंटने संक्रमित झाले आहेत, हे अहवाल आल्यानंतरच निश्चित होईल. तथापि, सर्व वयस्कांना लसीचे दोन्ही डोस मिळाले असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.