महाड – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या 7 डिसेंबरला स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
ते निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले असून, पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. स्वतः संभाजी राजेंनी याबद्दलची माहिती दिली.
दरम्यान, राष्ट्रपती रायगडावर येण्यापूर्वीच एक मोठी समस्या समोर येऊन ठेपली आहे. शिवप्रेमींनी राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवण्याला विरोध दर्शवला आहे.
“राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही’. असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र, आता यावरून नवा वाद निर्माण होत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे.
ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत. त्यामुळे शिवरायांचा अवमान होत असे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. रायगड किल्ल्यावर एकूण तीन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत.