मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या कथित नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून समोर आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याचवेळी आता अथियाने तिच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडील एका मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितले की अशा अफवा ऐकून मला खूप हसू येते.
मागील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अथिया आणि केएल राहुलने वांद्रे येथील एका इमारतीत स्वतःसाठी घर बुक केले आहे. या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना अथिया म्हणाली की, ती नवीन घरात जाणार आहे हे खरे आहे पण ती तिचे आई-वडील सुनील शेट्टी आणि माना शेट्टी व भाऊ अहान शेट्टीसोबत नवीन घरात शिफ्ट होत आहे.
यादरम्यान अभिनेत्रीने केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांबाबतही चर्चा केली. अथिया म्हणाली, “मी यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही. मला या सगळ्याचा कंटाळा आला आहे. आता मी फक्त या अफवांची मजा घेते. लोकांना जे काही विचार करायचे आहे ते विचार करू द्या.”
यापूर्वी अथियाचा भाऊ अहान यानेही अभिनेत्री आणि क्रिकेटरच्या लग्नाच्या अफवांचे खंडन केले होते. एका वृत्तवाहीनीशी बोलताना अहान म्हणाला होता की, “असा कोणताही सोहळा नाही, या सर्व अफवा आहेत. लग्न नसताना आम्ही तुम्हाला तारीख कशी देऊ शकतो? एंगेजमेंट सुद्धा झालेली नाही. सध्या अशी कोणतीही योजना नाही. तसेच पुढील काही महिन्यांत लग्नाची कोणतीही योजना नाही.” असेही अहान म्हणाला होता.
विशेष म्हणजे, अथिया आणि केएल राहुलच्या नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहेत. दोघांना एकत्र पाहून लोक त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्क लावत होते. तथापि, या जोडप्याने त्यांच्या अहानच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये त्यांचे नाते सार्वजनिक केले होते.