काबुल: अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ लागताच तालिबानी बंडखोरांनी केवळ आठवडाभरातच संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पहायला मिळाले. काबूलमधील मुख्य तुरुंग तालिबान्यांनी फोडले आणि हजारो दहशतवाद्यांनी तुरुंगातून पलायन केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्कींगवर व्हायरल होते आहे.
काबूलच्या तुरुंगातील हजारो कौद्यांना तालिबानने मुक्त केले आहे. यामध्ये ‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया'(आयएसआयएस) आणि ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्यांना सोडून दिलं. या दहशतवादी संघटनेशीसंबंधित दहशतवाद्यांचा समावेश आहे. तालिबानने हे शांततापूर्ण सत्तांतरणादरम्यान घडल्याचे म्हटले आहे.
Prisoners leaving Kabul jail after being broken out by Taliban. pic.twitter.com/B84F2UrtEA
— Richard Engel (@RichardEngel) August 15, 2021
रविवारी अफगाणिस्तान सरकारने बाग्राम एअरबेस तालिबानच्या ताब्यात दिला. या ठिकाणी पुल-ए-चाकरी तुरुंग आहे. या तुरुंगात पाच हजार कैदी आहेत. तालिबानने यावर ताबा मिळवल्यानंतर सर्व कैद्यांना सोडून दिले आहे. तुरुंगात सर्वाधिक कैदी हे अलकायदा आणि तालिबानी दहशतवादी होते.
अफगाण न्यूज एजन्सीने दाखवलेल्या फुटेजमध्ये तालिबानी दहशतवादी कैद्यांना सोडून देत असल्याचं दिसत आहे. तुरुंगामधून गोळीबाराचे आवाज आल्याचंही बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. एनबीसी न्यूजचे परराष्ट्र वृत्तांकनाचे प्रमुख रिचर्ड एन्जल यांनी तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या कैद्यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने नागरिकांना संरक्षणाची हमी देऊनही पूर्वानुभवामुळे भयभीत नागरिक आणि परदेशी दूतावासांतील कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अफगाणी सुरक्षा दलांनी पाश्चिमात्य देशांच्या लष्करांसाठी मोकळा केला आहे, असे एका वैमानिकाने सांगितले. तालिबानी बंडखोरांनी काबूल शहराच्या सीमांवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्या भागांमध्ये अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत होते, परंतु शहराला जोडणारे बहुतांश रस्ते शांत होते. कर्मचारी सरकारी कार्यालये सोडून निघून गेले आहेत. राजदूतावासांमधील कर्मचाऱ्यांनी मात्र संवेदनशील कागदपत्रे जाळून टाकल्याने धुराचे लोट शहरावर दिसत होते. तसेच तालिबान्यांनी काबूलचे मुख्य तुरुंग फोडून अनेक कैद्यांना मुक्त केले.