मळद येथील ट्रकचालकाचा खुन, दरोड्याचा गुन्हा 48 तासांत उघडकीस
रावणगावा/लोणी काळभोर- मळद (ता. दौंड) येथील ट्रक चालकाच्या खुनासह दरोड्याचा गुन्हा 48 तासांत उघडकीस आला असून इतर 6 गुन्हेही उघडकीस आले आहेत. तसेच मळद येथील खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना सिनेस्टाइलने दोन किमीपर्यंत पाठलाग करून पकडले, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22), समीर उर्फ सुरज किरण भोसले (वय 19 दोघे रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख (वय 35, रा. कसबे तडवळा, ता. जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. पद्माकर घनवट म्हणाले की, सोमवारी (दि. 30 मार्च) मध्यरात्री मळद गावच्या हद्दीत रेल्वे उड्डाणपुलाजवळ सोलापूर-पुणे महामार्गा लगत ही घटना घडली होती. गुन्हा करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मागील 15 दिवसांत पुणे-सोलापूर महामार्गावर लुटमारीच्या प्रमाणात वाढ झाली होती. सोमवारी घडलेल्या घटनेत ट्रक चालक मयत असल्याने प्रकार गंभीर स्वरूपाचा होता. करोना प्रतिबंध बंदोबस्ताचा ताण पोलीसांवर असून रात्रगस्त कडक करूनही गुन्हे घडत होते.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने समांतर तपासात गुन्ह्याची माहिती घेवून पुणे, अहमदनगर, सोलापूर येथे जावून वेशांतर करून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढून गुन्हा केलेले व पूर्वीचे रेकॉर्डवरील असलेले आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या पथकाची मदत घेतली. तर आरोपी पळू नये म्हणून रुग्णवाहीकेचा वापर करून मेडीकल स्टाफचा वेश परिधान करून वाड्या, वस्त्या तपासनात करीत असताना आरोपी गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. तत्काळ त्या ठिकाणी जावून आरोपी पोलीसांची चाहूल लागलेने पळून जाताना सुमारे 2 किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी या गुन्ह्यासह इतर सहा गुन्ह्याची कबूली दिली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.
- अट्टल गुन्हेगार
आरोपींवर दौंड व यवत पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा 1, जबरी चोरीचे 2 व चोरीचे 2 असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी गणेश चव्हाण हा सध्या शिक्रापूर व दौंड पोलीस ठाणे हद्दीत जबरी गुन्ह्यात फरारी आहेत.