सातारा – शाहूपुरी या उपनगरामध्ये गडकर आळी येथील रस्त्याचे दीड किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. हे काम पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहून ते तात्काळ थांबवावे अन्यथा या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाचे शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिला आहे.
सातारा शहराची हद्दवाढ जाहीर होऊन तब्बल पाच वर्ष उलटली आहेत. अधिसूचनेनंतरच्या दोन वर्षांमध्ये राज्य शासनाने येथील पायाभूत सुविधांसाठी 48 कोटी रुपयांचा निधी सातारा पालिकेला वर्ग केला आहे. या निधीतून उपनगरांमध्ये मुख्य रस्ते तसेच वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जाणारे सेवा रस्ते यांचे बांधकाम आणि दुरुस्ती याची कामे पालिकेने सुरू केली आहेत. शाहूपुरीतील गडकर आळी परिसरात गिरीगोसावी घर ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यानच्या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
शहर संघटक प्रणव सावंत यांनी याबाबत गंभीर आरोप केले असून हे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याला तात्काळ काळ्या यादी टाकावे, अशी मागणी केली आहे. डांबरीकरणांमध्ये डांबराचा अत्यल्प वापर होत असून केवळ खडी अंथरूण त्यावर रोलर फिरवला जात आहे. मुळात रस्त्याचे काम होताना त्यामध्ये चार प्रकारचे स्तर असतात. त्यामध्ये डांबराचा वापर मुबलक प्रमाणात असतो. प्रत्यक्षात या कामांमध्ये डांबर आणि खडी या व्यतिरिक्त कोणतेही इतर साहित्य वापरलेले नाही. सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे या कामावर कोणतेही थेट नियंत्रण नाही. ठेकेदाराने काम सुरू केल्यावर त्याच्या कामाचा दर्जा तपासणी बांधकाम विभागाचे काम असते. मात्र ठेकेदार व अधिकारी यांच्यातच संगनमत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.