पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला नेहमीच मतदान कमी होते. त्यामुळे महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याने घडाळ्याला मतदान करायला सांगा,’ असे आवाहन महायुतीमधील घटकपक्षांना केल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन बुधवारी धायरी येथे करण्यात आले होते. या वेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय माशेलकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार भिमराव तापकीर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, “महायुतीकडून विधानसभानिहाय मेळावे घेतले जात आहेत. मात्र, खडकवासलात भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. आम्ही सगळे महायुतीत आहोत. त्यामुळे मतदारांना सांगा, की बारामती-शिरुरमध्ये आपले चिन्ह घड्याळ आहे.’
मनसेचा महायुतीला फायदाच
मनसे महायुतीत आल्यास आम्हाला फायदाच होणार असल्याचे सांंगत पवार यांनी मनसेचे स्वागत केले आहे. महायुतीमध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शाह यांच्याकडून सुरू आहे. त्यासंदर्भात मनसेची देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे. त्याचा महायुतीला फायदाच होणार असल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले.