हांगझोऊ :- भारताला आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सहाव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (29 सप्टेंबर) टेनिसमध्ये रौप्यपदक मिळाले. रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या पुरुष जोडीला दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय जोडीला अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या हसू यू सिऊ आणि जेसन जुंग यांनी सरळ सेटमध्ये पराभूत केले. भारतीय जोडीला 6-4, 6-4 असा पराभव स्विकारावा लागला. यावेळचे टेनिसमधील भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताने 2018 मध्ये जकार्ता येथे तीन पदके जिंकली होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रामकुमारचे हे पहिले तर मायनेनीचे तिसरे पदक आहे. मायनेनीने 2014 इंचॉन गेम्समध्ये सतनाम सिंगसह पुरुष दुहेरीचे रौप्य आणि सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
दरम्यान,आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 च्या पुरुष टेनिस दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीचे अभिनंदन देखील केले आहे.