बर्मिंगहॅम -ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावांवर संपुष्टात आणताना यजमान इंग्लंडने ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या डावात सात धावांची निसटती आघाडी मिळवली. यानंतर पावसाचा व्यत्यय येईपर्यंत इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 27 धावा अशी मजल मारली व एकूण 34 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात बेन डकेट व जॅक क्राऊलीने संयमी केली. या जोडीने कोणताही धोका न पत्करता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा नेटान सामना केला.
तत्पूर्वी शनिवारच्या 5 बाद 311 धावांवरून रविवारी पुढे खेळ सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने अलेक्स कॅरीसह जिद्दीने फलंदाजी केली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 118 धावांची भक्कम भागीदारी केली व संघाचे त्रिशतक फलकावर लावले.
कॅरीने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 66 धावांवर परतला. त्याने या खेळीत 99 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याच्या पाठोपाठ ख्वाजाही परतला. त्याला दीडशतकी खेळी करता आली नाही. त्याने आपल्या 141 धावांच्या खेळीत 321 चेंडूत 14 चौकार व 3 षटकार फटकावले.
त्यानंतर मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजीला गुंडाळले. कर्णधार पॅट कमिन्सच्या 38 धावांचा अपवाद वगळता त्यांचा ऐकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकला नाही.
एकवेळ 5 बाद 311 अशा सुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी उपहारापूर्वीच 386 धावांवर संपुष्टात आला व यजमान इंग्लंडला 7 धावांची निसटती आघाडी मिळाली.
इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मोईन अलीने 2 बळी घेतले तर कर्णधार बेन स्टोक्स व जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता.