प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्यांमधून दररोज तब्बल 3 लाख नारळ पुण्याच्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये पूजेसह तोरणासाठी लागणाऱ्या नव्या नारळाला सर्वाधिक मागणी आहे. एका नगाची 20 ते 30 रुपयांना विक्री सुरू आहे.
गणेश उत्सवामुळे बाजार समितीच्या भुसार विभागात नारळाची आवक वाढली आहे. सार्वजनिक तसेच घरोघरी बसणाऱ्या गणरायाच्या पूजेसह मोदक, प्रसाद बनविण्यासाठी, तसेच सत्कार करण्यासह विविध प्रकारच्या मिठाईसाठी नारळाला मोठी मागणी राहते. या पार्श्वभूमीवर बाजारात दरवर्षी नारळाची मोठ्या प्रमाणात आवक होते.
यामध्ये तामिळनाडू येथील वाणी-अंबाडी येथून नवे नारळ, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून मद्रास, पालकोल व साफसोल नारळाचा समावेश आहे. विशेषत: तामिळनाडूच्या नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी जास्त मागणी असते. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. तर, आंध्रचा पालकोल तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी राहते. हा नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक खानावळ, केटरिंग व्यवसायाकडून मोठी मागणी असते. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने पूजेसाठी लागणाऱ्या विविध जिनसांना मागणी राहिली, असे सांगण्यात आले.
नारळाचा प्रकारशेकडा भाव (रुपयांत)
मद्रास2,600 ते 2,700
पालकोल1,450 ते 1,550
नवा नारळ1,300 ते 1,500
साफसोल1,500 ते 2,500
करोनामुळे नारळाची उलाढाल मंदावली होती. यंदा निर्बंधमुक्त व उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील धार्मिक स्थळांहून नारळाला चांगली मागणी आहे. परिणामी, यंदा गणेशोत्सवात चांगली उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.
– दीपक बोरा, नारळाचे व्यापारी,
मार्केट यार्ड.