मुंबई – ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह इतरांना सोमवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आले. कोर्टात त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली असून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत या सर्वांना तीन दिवसांच्या एनसीबी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आर्यन शाहरुख खान याचा मुक्काम 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीतच असणार आहे.
यावेळी कोर्टामध्ये एनसीबीचे वकील आणि आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांच्यात प्रदीर्घ युक्तीवाद झाला. आर्यनला जामीन मिळावा यासाठी मानशिंदे यांनी आर्यनच्या एनसीबी कोठडीवर आक्षेप घेत ही कोठडी का हवी आहे, अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर एनसीबीच्या वकीलांनी सांगितले की, आर्यन खानची कस्टडी घेऊन त्याच्याकडून त्याला या पार्टीमध्ये का बोलवण्यात आले होते यासह अन्य काही गोष्टीं जाणून घ्यायच्या आहेत. त्यावर सतीश मानशिंदे यांनी सांगितले की, ‘आर्यन खानला क्रुझवर जाऊन ड्रग्ज विकण्याची अजिबात गरज नाही. तो या क्रुझवर का गेला होता याच्याशी एनसीबीचे काहीही देणेघेणे नाही. आर्यनला वाटले तर तो संपूर्ण क्रुझ खरेदी करू शकतो…’, असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला.
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवेळी सरकारी वकीलांनी सांगितले की, आर्यनच्या मोबाईलमधून ड्रग्ज संदर्भात केलेले चॅट सापडले आहेत. काही चॅट 21 जुलैचे आहेत. या चॅटमधून काही अनोळखी व्यक्तींशी त्याने गांजा संदर्भात बोलणे केले होते. सरकारी वकिलांनी हे चॅट कोर्टात सादरही केले.