नवी दिल्ली – देशातील नागरिकांना देण्यात आलेल्या करोनालसींच्या एकूण डोस संख्येने सोमवारी 91 कोटींचा टप्पा ओलांडला. देशातील 70 टक्के प्रौढांना आतापर्यंत पहिला डोस प्राप्त झाला आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 25 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
देशातील करोना लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली. उत्तरोत्तर त्या मोहिमेने वेग घेतला आहे. मे महिन्यात दिवसाला सरासरी 19.69 लाख डोस देण्यात आले. ती दैनंदिन सरासरी वाढून जुलैमध्ये 43.41 लाखांवर पोहचली.
तर, सरलेल्या महिन्यात (सप्टेंबर) दिवसाला सरासरी 79 लाख डोस देण्यात आले. आता डोस संख्येबाबत 100 कोटींचा पल्ला देश लवकरच गाठेल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या 5 कोटी 67 लाखांहून अधिक डोस उपलब्ध आहेत.
चालू वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) लसींचा पुरवठा वाढवण्याची ग्वाही उत्पादकांनी दिली आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे.