नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवी संदर्भात कथित बदनामीकारक विधानांमुळे गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत केलेल्या अपमानास्पद विधानांवरून गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला मेट्रोपॉलिटन कोर्टाने अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करणारी आप नेत्यांची याचिका न्या. समीर दवे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. अरविंद केजरीवाल यांचे वकील आणि पीपी मितेश अमीन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने शुक्रवारी (11 ऑगस्ट) हा आदेश दिला.
अहमदाबादमधील मेट्रोपॉलिटन न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीच्या वादाच्या संदर्भात त्यांच्या कथित बदनामीकारक विधानांमुळे गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात केजरीवाल आणि संजय सिंह यांना 11 ऑगस्टला समन्स बजावण्यात आले होते.
तथापि, सत्र न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी खटल्याला अंतरिम स्थगिती देण्याची त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयातील फेरविचार अर्जावर आता 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.