कला-जगण्याची

आपल्या रोजच्या जगण्याकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की, आपले जीवन हे वादाचे आहे. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही वाद सुरू असतो. घरात असताना घरातील व्यक्‍तींशी वाद, घराबाहेर पडल्यावर बाहेरच्या व्यक्तींशी वाद,ऑफिसमध्ये गेल्यावर तेथे वाद. मनुष्य जेथे जाईल तेथे वाद निर्माण करत असतो. हा वाद केवळ व्यक्‍तिगत पातळीवर न राहता तो सामूहिक रूपदेखील धारण करतो. दोन कुटुंबातील वाद, दोन जातींमधील वाद, दोन धर्मामधला वाद, दोन देशांमधला वाद. खरेच वादाशिवाय माणूस जगूच शकत नाही का? कारण कोणताही वाद माणसाच्या जीवनात दु:ख निर्माण करत असतो, त्याला असुरक्षित बनवत असतो,त्याची झीज घडवून आणत असतो. तसे पाहिले तर जगण्यासाठी प्रत्येक जीव हा धडपडत असतोच.

किंबहुना ही धडपड हेच त्याचे जीवन असते. परंतु या धडपडीतून कलह हा फक्त मानवी जीवनातच निर्माण होताना दिसतो. सामूहिक स्तरावर या कलहाचे रूपांतर युद्धात होते. मानवी इतिहास हा विविध प्रकारच्या युद्धांच्या तपशिलांनी खच्चून भरलेला आहे. युद्ध, त्यातून घडणारा विनाश व होणारी दु:ख निर्मिती वारंवार अनुभवूनसुद्धा मानव अजून शांततेत जगण्यास शिकलेला दिसत नाही. मानवाने विज्ञानाची कास धरून आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी तो पूर्णपणे वादमुक्त करू शकलेला नाही. आणि कोणत्याही वादाशिवाय जगणे हीच तर खरी जगण्याची कला आहे. विशिष्ट प्रकारे श्‍वास घेणे, विशिष्ट पद्धतींचे अवलंबन करणे म्हणजे जगण्याची कला नव्हे. तसे करणे म्हणजे अमर्याद संभावना असलेल्या मानवी जीवनाला अत्यंत संकुचित करून टाकणे होय.

आपल्या जीवनात वाद का आहे, असा प्रश्‍न तरी आपण स्वत:ला कधी विचारला आहे का? की हा वाद आपण गृहीतच धरला आहे? जगण्यासाठी झगडणे हे आपल्या इतके अंगवळणी तर पडलेले नाही ना, की त्यामुळे असा प्रश्‍नच आपल्या मनात उद्भवत नाही? वादामुळे जीवनास एक प्रकारची धार येते, वादाशिवाय जीवन अगदीच अळणी व सुस्त होते, अशी तर आपल्या मनाची धारणा झालेली नाहीये ना?माणसाच्या जीवनातील वाद म्हणजे फक्त माणूस व त्याच्या भोवतालची परिस्थिती यांच्यातीलच संघर्ष नव्हे, तर माणसाच्या आत, त्याच्या मनातदेखील सातत्याने संघर्ष चाललेला असतो. परस्परविरोधी विचार, परस्परविरोधी भावना व त्यातून निर्माण होणारा विसंवाद हे सर्व मानवाच्या आंतरिक संघर्षांचेच द्योतक आहे.

हा आंतरिक संघर्षच तर बाहेर प्रक्षेपित होत नाहीये ना? माणूस अंतर्बाह्य इतका संघर्षमय का आहे? या प्रश्‍नांचा शोध घेण्यासाठी आपल्याला स्वत:च्या जीवनाकडे बघणे आवश्‍यक आहे. बाह्यत: आपण इतरांपेक्षा कितीही वेगळे वाटत असलो तरी आंतरिकदृष्ट्या आपण वेगळे आहोत का? काय आहे आपल्या आत जे इतरांपेक्षा वेगळे आहे? भीती, ती तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणसाच्या मनात असते. कशाची भीती, हे तपशील वेगवेगळे असले तरी भीतीची प्रत्यक्ष भावना ही कोणत्याही मानवात सारखीच असते. त्याचप्रमाणे माझ्या आत मला जाणवणारा क्रोध हा इतर कोणत्याही माणसास जाणवणाऱ्या क्रोधासारखाच असतो.

मानसशास्त्रीय पातळीवर माझ्या आत जे-जे काही आहे, ते ते सर्व इतर कोणत्याही माणसाच्या आतदेखील आहे. भौतिक पातळीवर मी इतरांपेक्षा कितीही वेगळा असलो तरी मानसशास्त्रीय पातळीवर मी इतरांसारखाच आहे. हे विधान स्वीकारण्यास कितीही अवघड वाटले तरी ते मानवी जीवनाचे एक वास्तव आहे. असे असूनही मी स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे का समजत असतो? प्रत्यक्षात वेगळे असणे व स्वत:ला वेगळे समजणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रत्यक्षातले वेगळेपण जीवनात विविधता आणते, वैविध्यपूर्ण समृद्धी आणते. परंतु स्वत:ला वेगळे समजण्याची भावना ही जीवनात विभाजन आणते. मानसशास्त्रीय पातळीवर वास्तविकरीत्या वेगळा नसलेला माणूस जेव्हा स्वत:ला वेगळा समजू लागतो, तेव्हा तो स्वत:ला इतरांपासून विभक्‍त करतो. आणि जेथे असे मानसिक विभाजन होते तेथे संघर्ष हा अटळ असतो.

प्रा. भगवान गावित

Leave A Reply

Your email address will not be published.