कर्जत – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील किमी 1 ते 5 चिलवडी शाखा कालवा, किमी 6 ते 9 चिलवडी शाखा कालवा, किमी 6 ते 15 कर्जत शाखा कालवा, किमी 215 ते 226 या चाऱ्यांचे काम सुरू असून, या कामाचे उद्घाटन नुकते आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. पवार यांनी कर्जत तालुक्यास कुकडीची वर्षात तीन आवर्तने देण्यात येतील, असे सांगितले.
चिलवडी शाखा कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 13 हजार 694 हेक्टर असून, त्यापैकी कर्जत तालुक्यात सात हजार 259 हेक्टर एवढे लाभक्षेत्र आहे. त्यातील उर्वरित सहा हजार 435 हे. क्षेत्र हे करमाळा तालुक्यात मोडते. या चारीचे कालवा मुखाशी चारीची विसर्ग क्षमता 312 क्यूसेक्स एवढी असून, सध्याच्या तांत्रिक अडचणीमुळे सध्या ही चारी जास्तीत जास्त 200 क्युसेक्सने चालू शकते.
संकल्पित विसर्गाने चारी चालवण्यासाठी मुख्य कालव्यावर काटनियामक प्रस्तावित असून, त्याचे काम होणे बाकी आहे.हे काम सन 2020 पर्यंत पूर्ण होणार असून, संकल्पीत विसर्ग सोडणे शक्य होईल. चिलवडी शाखा कालव्याचे 13 हजार 694 हे. क्षेत्राकरिता पाच वितरिका आहेत. तसेच शाखा कालव्यावर डाव्या व उजव्या बाजूच्या मिळून 29 लघुवितरिका, तसेच 46 विमाचक आहेत. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पाणी वितरण करणे जिकिरीचे ठरते. सध्या अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे 35 कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्यासाठी आ. पवार हे प्रयत्न करत आहेत. चिलवडी कर्जत शाखा 1 ते 15 मुख्य कालवा व 205 ते 226 मार्च 2020 नंतर 141 ते 172 अस्तरीकारण सुरू होणार आहे.
चिलवडी शाखा कालव्याचे 41 किमी पैकी 27 किमी पर्यंत वज्रचुर्ण अस्तरीकरण प्रस्तावित केले असून, त्यापैकी किमी 1 ते 9 व किमी 22 मधील यांत्रिकी अस्तरीकरणाचे अपूर्ण काम सुरू करण्यात आले आहे. किमी 1 ते 5 मधील अस्तरीकरण पूर्वीचे काटछेद तयार करण्याचे काम सुरू आहे आणि गुणनियंत्रण विभागाच्या सूचनेनुसार अस्तरिकरणाचे काम सुरू होणार आहे. सध्या किमी 6 ते 8 हे काम पूर्ण झाले आहे, तर किमी 9 व 22 चे काम प्रगतिपथावर आहे. मार्च अखेर चिलवडी चरीवरील सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मार्च 2020 अखेर सुमारे 10 कोटी निधीची आवश्यकता आहे. निधीअभावी ही कामे प्रलंबित राहत होती. मात्र आ. पवार यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांची ही प्रतीक्षा आता सत्यात उतरताना दिसत आहे.