मुंबई – कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस्, घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना शिवछत्रपती व अन्य पुरस्कारपात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे. २९ डिसेंबरला जाहीर करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीनुसार या खेळांना या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानंतर या खेळांशी संबंधित व्यक्ती, संघटना तसेच खेळाडू व चाहते यांनी टीका केली आहे.
ऑलिम्पिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळांचा समावेश नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही त्यामुळे या खेळांमधून महाराष्ट्रातील खेळाडूंची कारकीर्द, नोकरी, उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याआधी या खेळांमधील खेळाडूंना श्री शिवछत्रपती व अन्य क्रीडा पुरस्कार दिले जात होते, पण यंदा निकष लावून विशिष्ट खेळांना डावलण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून या खेळात अनन्य साधारण कामगिरी केलेल्या खेळाडूंना नोकऱ्या देण्यात येत आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव. तालुका/ जिल्हास्तरीय स्पर्धा न होणे. प्रचार व प्रसारापासून दूर. अशा प्रकारात मोडणाऱ्या घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना पुरस्कारासाठी पात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे.
ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल या महत्त्वाच्या तीन स्पर्धांमध्ये समावेश नसल्यामुळे पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम आणि स्नूकर, बिलियर्डस् या खेळांना पुरस्कारासाठी पात्र क्रीडा यादीतून बाहेर काढण्यात आले आहे.