पिरंगुट -खांबोली (ता. मुळशी) येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पौड पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत बाबुराव बारकर (वय 26, रा. खांबोली, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगून येणार असल्याची माहिती हवालदार अब्दुल शेख यांना मिळाली.
त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ व मानसिंग खोचे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार अब्दुल शेख, पोलीस नाईक जय पवार, सागर बनसोडे, पोलीस शिपाई सुहास सातपुते, मयूर निंबाळकर यांना घटनास्थळी पाठविले.
पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी हनुमंत बाबुराव बारकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने या आरोपीचा पाठलाग करून शिताफीने पकडले. आरोपीची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल व मोकळी मॅगझिन आढळून आले.