संस्कृतला मुस्लिम प्राध्यापक नेमल्याने “बनारस’मध्ये आंदोलन

वाराणसी : येथील बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृत विषयाला अनपेक्षित व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्याहीपेक्षा अधिक आश्‍चर्यकारक विरोध करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यापीठातील संस्कृत विद्याधाम विज्ञानमध्ये डॉ. फिरोझ खान या मुस्लिम प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आल्याने या वादाला तोंड फुटले.

विद्यापीठाने या नियुक्तीचे समर्थन केले आहे. सर्व नियम आणि निकषांची पुर्तता केल्यानेच डॉ. खान यांची नियुक्ती केल्याचा दावा करण्यात आला. अभाविपचा झेंडा न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाने त्याला विरोध सुरू केला. या विभागात केवळ संस्कृतच नव्हे तर धार्मिक संहिताही शिकवल्या जातात. डॉ. खान संस्कृत शिकवू शकतील मात्र, या संहिता ते अधिकारवाणीने सांगू शकणार नाहीत, असे कारण या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पुढे केले आहे. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी संशोधक पाठ्यवृत्तीधारक आणि विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या निवासस्थानाजवळील होळकर भवन येथे ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान, विद्यापीठातील अन्य विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी अभाविपचे कार्यकर्तेच आहेत. याच संघटनेचे हे काम आहे. तर आंदोलनकर्त्यांच्या दाव्यानुसार, हे विद्यापीठाच्या ध्येयधोरणांशी विसंगत कृतीअसल्याने आमचा त्याला विरोध आहे. अभाविपचे राज्य प्रभारी आशिर्वाद दुबे यांनी यावर भाष्य केले. संस्कृत विभागात मुस्लीम प्राध्यापकाची नियुक्ती हे कुलगुरू हिदुद्वेष्टे असल्याचे निदर्शक आहे, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×