17 एप्रिल ते 24 एप्रिल 2022 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : सध्या तुमचा उत्साह वाढवणारे ग्रहमान लाभले आहे. व्यवसायात ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतक, बॅंका यांच्या मार्फत करा. कामात कसूर झालेली सहन होणार नाही. सरकारी कामात दक्ष राहावे. नोकरीत मरगळ नाहीसे करणारे काम करण्यात येईल. नवीन ओळखी होतील. अनपेक्षित लाभ होतील. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. नवीन खरेदीमुळे खर्च वाढेल. खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
वृषभ : मनातील ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ व पैसा खर्ची पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तात्पुरती पैशाची चणचण जाणवेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची कामात मदत मिळेल हे गृहित धरू नका. स्वयंसिद्ध रहा. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा म्हणजेच प्रकृतीवर ताण येणार नाही. घरात व्यक्तींचे हट्ट पुरवताना दमछाक होईल. मानसिक समाधान मात्र मिळेल. महिलांना मनाजोगते वागता व खर्च करता येईल.
मिथुन : जीवनाचा आनंद घेण्याकडे कल राहील. त्यामुळे आत्मविश्वास बळावेल. व्यवसायात कामाची नवी उर्मी जागृत होईल. स्वत:चे अस्तित्व दाखवण्याचा विशेष प्रयत्न राहील. हवी असलेली संधी मिळाल्याने आनंदी राहाल. प्रतिष्ठित व्यक्तींचा कामात उपयोग होईल. नोकरीत लांबलेल्या कामांना चालना मिळेल. चांगल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल ते तुमची वाखाणणी करतील. घरात सर्वांना आवडणारी खरेदी कराल. मन प्रसन्न राहील.
कर्क : प्रकृतीमान सुधारल्याने आनंदी व उत्साही दिसाल. तुमच्या आनंदात सभोवतालच्या व्यक्तींनाही सहभागी करून घ्याल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन कामांना वेग येईल. पैशाची चिंता मिटल्याने तुमचे काही बेत सफल होतील. कामात दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत अडचणीवर मात करून नेटाने काम संपवाल. जोडधंद्यातून लाभ होतील. घरात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत घालवाल. महिलांना अंगी असलेले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल.
सिंह : हात आखडता घेऊन राहिलात तर लाभ तुमचाच होईल. भविष्यातील तरतुदीसाठी जागरूक असाल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा विचार असेल. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी पैसे खर्च कराल. त्यामुळे तुमच्या वर्तुळात तुमचा दबदबा राहील. नोकरीत वरिष्ठ केलेल्या कामाचे कौतुक करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल.
कन्या : सध्या आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान आहे. व्यवसायात पैशाअभावी रखडलेले बेत आता सफल होतील. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यवसायात योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी करा. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. पगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करा. वरीष्ठ तुमच्या रास्त मागण्या मान्य करतील. घरात, कामात इतर व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. महिलांना प्रतिष्ठा मिळेल.
तुळ : बऱ्याच काळाने दिलासा देणारे ग्रहमान लाभले आहे. त्यामुळे शांतता वाटेल. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीचा फायदा करून घेतलात तर आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ अवघड उद्दिष्टे तुमच्यापुढे ठेवतील. जोडधंदा करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. घरात प्रिय व्यक्तींच्या जीवनात शुभ घटना घडेल. महिलांना त्यांच्या वर्तुळात प्रसिद्धी मिळेल.
वृश्चिक : ग्रहांची मर्जी आहेच त्याचा लाभ घ्या. व्यवसायात मोठे बेत साकार करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी वेळ व पैशाचा वापर करून तुमचे इप्सित साधू शकाल. खेळत्या भांडवलाची तरतूद करून घ्याल. गरजेनुसार योग्य व्यक्तीची निवड कामासाठी कराल. नोकरीत ठरवलेली कामे पूर्ण होतील. कामाचा ताणही कमी होईल. प्रकृतीच्यस तक्रारी कमी झाल्याने उत्साही राहाल. घरात अत्यावश्यक खर्च करावे लागतील.
धनु : ध्येय धोरण ठरवून आर्थिक तरतूद कराल त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात मोठ्या कल्पना आणि त्यातून मिळणारा जादा फायदा असे उद्दिष्ट असेल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोगही त्या कामी कराल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात सफलता लाभेल. घरात कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. मानसिक समाधान व गृहसौख्याचा आनंद घेता येईल. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. महिलांना आवडता धंद जोपासता येईल.
मकर : तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवून बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात कामाचा भार वाढेल. पण त्यातून पैसे मिळणार असल्याने त्याचे तुम्हाला काहीही वाटणार नाही. कंटाळवाण्या कामातून तुमची सुटका झाल्याने हायसे वाटेल. गोड बोलून सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्याल. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलती व सुविधा देतील. नवीन ओळखी होतील. इच्छापूर्तीसाठी सढळ हाताने खर्च कराल. महिलांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.
कुंभ : नवीन अनुभव येतील, तरी सतर्क राहा. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तीकडून बरेच काही शिकता येईल. अनुभवाची शिदोरी घेऊन पुढची ध्येयधोरणे आखा. बॅंका, हितचिंतक यांचेकडून कर्ज मिळेल. त्या जोरावर विक्री व उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत एखाद्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल. जोडधंदा असणाऱ्यांना नवीन कामे मिळतील. घरात वातावरण आनंदी राहील. सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
मीन : मानलं तर समाधान मिळेल. व्यवसायात जे काम करत आहात त्याचा फायदा किती व कधी मिळेल याविषयी साशंकता असेल.
संथगतीने काम करून यशश्री मिळवण्याचे ध्येय राहील. खेळत्या भांडवलासाठी वेळ व शक्ती खर्ची पडेल. नोकरीत स्वत:चे काम संपवून सहकाऱ्यांना कामात मदत करावी लागेल. वरिष्ठ गोड बोलून जादाची कामे करून घेत नाहीत ना? याकडे लक्ष ठेवा. घरात तात्विक मतभेद होतील, रागावू नका. तरुणांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.