मुंबई – तान्हाजी चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत आता आणखी एका धमाक्यासाठी सज्ज झाले आहेत. बाहुबली स्टार प्रभास आणि ओम राऊत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
दुर्गुणांवरील सद्गुणांच्या विजयाभोवती फिरणाऱ्या हिंदुस्थानी या महाकाव्याचे चित्रपट रूपांतर असून यात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बाहुबलीनंतर प्रभास पुन्हा एपिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रभास बरोबरच या सिनेमात सैफ अली खान लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार सीतेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा या सिनेमात झळकणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिग्दर्शकाबरोबर बोलणी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सिनेमातील सीता या पात्रासाठी अनुष्का शर्माला निर्मात्यांची पहिली पसंती आहे. तिला या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली असून ती या चित्रपटाची कथा ऐकून भारावली आहे. या अहवालानुसार दिग्दर्शक ओम राऊत यांच्याबरोबरची तिची भेट चांगली झाली असून तिला या पात्रासाठी जवळपास नक्की समजण्यात येत आहे. नुकतेच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपण आई वडील होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनुष्का शर्मा हिच्याबरोबरची बोलणी यशस्वी झाली आणि तिच्या तारखा जुळून आल्या तर त्यानुसार चित्रपटाच्या शूटिंगचे वेळापत्रक आखण्यात येणार आहे.