नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या दोन दिवसात झालेल्या हिंसाचारामागे समाजविघातक शक्ती आहेत. दिल्लीतील नागरिकांचा या हिंसाचारामागे कोणताही हात नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीच्या विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी या हिंसाचाराबाबतचे निवेदन करताना ही माहिती दिली.
दिल्लीतील नागरिकांना हिंसाचार नको आहे. हा हिंसाचार सर्वसामान्य नागरिकांनी केलेला नाही. हा हिंसाचार समाजविघातक, राजकीय आणि परकीय गटांकडून केला गेला आहे. दिल्लीतील हिंदू आणि मुस्लिमांना हिंसाचार नको आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
या हिंसाचारामध्ये ठार झालेले हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात यावे, अशी अपेक्षाही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.
काल रात्रभर आपण अनेक गटांच्या संपर्कात होतो. हिंसाचारात जखमी झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांचीही आपण भेट घेतली. परिस्थिती सतर्क रहावी, अशीच आहे. पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करूनही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिस्थिती आटोक्यात आणता येईल, असा आत्मविश्वासही पोलिसांना वाटत नाही. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करावे आणि तणाव असलेल्या भागात ताबडतोब संचारबंदी लागू कराला पाहिजे. यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहीले असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.