नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी यांनी राष्ट्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचे सूतोवाच केले आहे. पुढील काळात केवळ केरळमधील राजकारणात योगदान देण्याचे त्यांनी ठरवले आहे.
माजी संरक्षणमंत्री असणाऱ्या अँटनी यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत 2 एप्रिलला समाप्त होणार आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभा सदस्य बनणार नसल्याचे त्यांनी बुधवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. माझे वय आता 81 वर्षे आहे. माझी प्रकृतीही ठीक नसते. त्यामुळे माझ्याऐवजी तरूण नेत्याला संधी मिळायला हवी.
राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर मी केरळला मुक्काम हलवेन, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या दिग्गज कॉंग्रेस नेत्यांमध्ये अँटनी यांचा समावेश होतो. गांधी परिवाराचे ते विश्वासू मानले जातात. आजवर कॉंग्रेसने त्यांच्यावर पक्ष संघटनेतील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
त्याशिवाय, केरळमध्ये आणि केंद्रात त्यांनी महत्वाची पदेही भुषवली. केरळचे मुख्यमंत्रिपद त्यांनी तीनवेळा सांभाळले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. तब्बल पाच वेळा ते राज्यसभा सदस्य बनले.