सातारा -दिव्यनगरी (ता. सातारा) येथे रियल इस्टेट एजंट संतोष उर्फ विठ्ठल जिजाबा सूळ (रा. आवाडवाडी, ता. सातारा) यांचा भरदिवसा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी जीवन चंद्रकांत निकम (रा. आंबेदरे, ता. सातारा) याला शनिवारी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संतोष सूळ या रियल इस्टेट एजंटचा शुक्रवारी सकाळी दिव्यनगरी परिसरात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मृत सुळ यांच्या भावाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारीच एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले होते.
दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी शनिवारी जीवन निकम याला आंबेदरे परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता जागेच्या वादातून सुळ यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी अधिक तपास करत आहेत.