नवी दिल्ली – आंध्र प्रदेशमधील खासदार बालाशौरी वल्लभानेनी यांनी त्या राज्यातील सत्तारूढ वायएसआर कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्या पक्षासाठी संबंधित घडामोड आणखी एक राजकीय हादरा ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी एक आमदार आणि अनेक नेत्यांनी वायएसआर कॉंग्रेसमधून बाहेर पडून तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. त्या पाठोपाठ वल्लभानेनी यांनी वायएसआर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते लवकरच अभिनेते पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.
आंध्रात तेलगू देसम आणि जनसेना या पक्षांनी युती केली आहे. त्या राज्यात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतात. त्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. दोन पक्षांच्या युतीमुळे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर कॉंग्रेससमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
अशात त्या पक्षाला निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असतानाच गळतीसत्र लागल्याचे चित्र आहे. वायएसआर कॉंग्रेसमधील आणखी काही नेते आगामी काळात पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.