जबरी चोरीप्रकरणी आणखी एक जेरबंद

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे – दुचाकीवरून चाललेल्या व्यावसायिकाचा पाठलाग करून गळ्यातील 3 लाख रुपये असलेली बॅग़ लांबविल्याप्रकरणात आणखी एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला दि. 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गणेश ऊर्फ दाद्या तुकाराम घावरे (वय 19, रा. कोंढवा), असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी अजय प्रकाश निकाळजे (वय 23), सुनील अनिल कदम (वय 27, दोघेही, रा. कोंढवा बुद्रुक) आणि अल्ताफ ऊर्फ बचक्‍या इकबाल पठाण (वय 28, रा. ताडीवाला रस्ता) या तिघांना अटक केली आहे. तर आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. याबाबत बिबवेवाडी भागात राहणाऱ्या 28 वर्षीय व्यक्‍तीने फिर्याद दिली आहे.

ही घटना दि. 13 मार्च रोजी रात्री 9.40 च्या सुमारास बिबवेवाडी येथील एका रस्त्यावर घडली. फिर्यादी दुचाकीवरून चालले होते. रोख रक्‍कम असलेली बॅग त्यांनी गळ्यात अडकविली होती. फिर्यादींचा पाठलाग करून हिसका मारून ही बॅग लांबविण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी घावरे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी दुचाकीसह रोख रक्‍कम मिळून 32 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील उर्वरित रक्‍कम जप्त करण्यासाठी, तसेच फरार साथीदाराच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.