बाबरी मशिद प्रकरणी प्रज्ञासिंह यांचे आणखी एक वादग्रस्त विधान

निवडणुक आयोगाने पुन्हा बजावली नोटीस
लखनौ – ज्या लोकांनी बाबरी मशिद पाडली त्या लोकांमध्ये आपलाही समावेश होता आणि या घटनेचा आपल्याला अभिमान आहे असे विधान भाजपच्या भोपाळ मतदार संघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एक नोटीस बजावली आहे. स्वता प्रज्ञासिंह यांनीच आपल्याला दुसऱ्यांदा नोटीस बजावली गेल्याची माहिती दिली. तथापी त्यांनी आपण जे काही म्हणालो त्याचे पुन्हा समर्थन करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे की बाबरी मशिद हटवून आम्ही या देशावरील कलंक दूर केला आहे. मी स्वता त्या दिवशी त्या मशिदीच्या घुमटावर चढले. तो पाडून टाकण्याच्या कामात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान आहे. ईश्‍वरानेच मला ही संधी दिली. आता त्या जागी शक्‍य तितक्‍या लवकर राम मंदीर उभे राहावे अशी आपली इच्छा आहे असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

या प्रकरणी नोटीस मिळाल्यानंतर त्या विषयी प्रतिक्रीया देताना त्यांनी म्हटले आहे की मी ती मुलाखत दिली आहे. मशिद पाडण्यासाठी मी स्वताच तेथे गेले होते आणि मी पुन्हा हेच विधान अभिमानाने करीत आहे. मी त्याचा इन्कार करीत नाही. मी पुन्हा तेथे जाईन आणि राम मंदिराच्या निर्माणासाठी प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या. ते करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असेही त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.