दिल्ली वार्ता: यूपीत मुलायमसिंह यादव – मायावती यांची वज्रमूठ

वंदना बर्वे

यूपीत मुलायमसिंह यादव आणि मायावती, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार, काश्‍मिरात मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि डावे, तमिळनाडूत द्रमुक आणि अद्रमुक कधीतरी एका व्यासपीठावर येतील, अशी कल्पना कधी तरी कुणी केली असेल काय? तर उत्तर नकारार्थी आहे. मात्र, मुलायमसिंह यादव आणि मायावती एकत्र आल्यामुळे क्षेत्रीय पक्षांच्या मनातील कटुता संपण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत मा. गो. वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस आणि भाजपला एकत्र येऊन केंद्रात सरकार स्थापन करण्याचा सल्ला आपल्या लेखातून दिला होता. केंद्रातील सरकार क्षेत्रीय पक्षांवर अवलंबून असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी होऊ लागल्या होत्या. क्षेत्रीय पक्षांच्या मदतीशिवाय सरकार बनविणे शक्‍य नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला मन मारून स्थानिक नेत्यांचे म्हणणे मान्य करावे लागत होते. याचा परिणाम देशाच्या विकासावर होत होता. म्हणून मा. गो. वैद्य यांनी कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांनी एकत्र यावे आणि दोघांनी मिळून सरकार स्थापन करावे असा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला केवळ एक विचार होता. ही बाब मान्य करण्यासारखी नाही हे स्वतः वैद्य यांनाही माहीत होती. राजकीय पक्षांनीसुद्धा त्याकडे मोठ्या माणसाचा सल्ला म्हणूनच बघितलं होतं.

मुळात, एकाच राज्यांतील दोन मुख्य विरोधी पक्ष जे सत्तेसाठी एकमेकांविरोधात लढतात त्याचं एकत्र येणे कधीही शक्‍य नाही. कारण, एकमेकांचा पराभव करूनच त्यांना सत्ता मिळविता येते. हीच बाब देशपातळीवरही लागू होते. यामुळे कॉंग्रेस आणि भाजपचं एकत्र येणंसुद्धा शक्‍य नव्हतं. अशात, कॉंग्रेस किंवा भाजपला केंद्रातील सरकार स्थापन करताना एखाद्या क्षेत्रीय पक्षाची मदत घ्यायची असेल तर एका राज्यातील कोणत्या तरी एका पक्षाचीच घ्यावी लागायची. जसे केंद्रातील सत्तेत द्रमुक किंवा अद्रमुक यांपैकी एकच पक्ष सहभागी असेल.

खरं म्हणजे, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती भविष्यात कधीतरी एकत्र येतील, याची कुणी कल्पनासुद्धा केली नसेल. एकत्र येण्याचं सोडा; एकमेकांचं तोंड कधी बघतील याचीही शाश्‍वती नव्हती. परंतु मुलायमसिंह यादव आणि मायावती एकत्र आले. एकच व्यासपीठ शेअर केलं. जवळजवळ बसले. ही बाब भारताच्या राजकारणातील खरंच ऐतिहासिक आहे. याआधी अशीच अनपेक्षित घटना बिहारमध्ये घडली. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी हातमिळवणी केली. बिहारमध्ये जो सत्ता संघर्ष होता तो याच दोन नेत्यांमध्ये होता. यामुळे ते कधी एकत्र येतील असे वाटले नव्हते.जम्मू-काश्‍मीरमध्येसुद्धा असाच चमत्कार बघायला मिळाला.

मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरस एकमेकांचे कट्टर शत्रू पक्ष. एकत्र येण्याची सुतराम शक्‍यता नाही. मात्र, भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पीडीपीने नॅकॉंला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. यात केंद्रातील भाजप सरकारने विरजण सोडले नसते तर काश्‍मिरात पीडीपी, नॅकॉं आणि कॉंग्रेसचे आघाडी सरकार अस्तित्वात असते. तिकडे पश्‍चिम बंगालमध्येसुद्धा असाच एक प्रयोग होण्याची शक्‍यता आहे.

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांचे एकत्र येणे अजिबात शक्‍य नाही; परंतु लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गरज पडली तर हेही पक्ष आतून एकमेकांना सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत आहेत. तमिळनाडू यास थोडा अपवाद आहे. अद्रमुकच्या नेत्या जयललिता आणि द्रमुक नेते करुणानिधी हे दोन्ही नेते आता हयात नाहीत. दोघांमध्ये कट्टर शत्रुत्व. आता या पक्षांची धुरा दुसऱ्या रांगेतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळे भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही.

थोडक्‍यात, देशभरातील क्षेत्रीय पक्षांच्या मनातील कटुता संपण्याच्या मार्गाकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणायला हरकत नाही. मुलायमसिंह यादव आणि मायावती एक झाल्याने यास मोठे बळ मिळाले आहे. एकत्र येण्यामागचे कारण काळाची गरज असू शकते.

समाजवादी पक्षाची धुरा अखिलेश यादव यांच्या हाती आली आहे. तर बसपाची धुरा मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांच्या हातात असेल. परंतु यास बराच वेळ आहे. मायावती काही एवढ्यात निवृत्त होण्याची शक्‍यता नाही. परंतु दोन्ही पक्षांतील मुलांसाठी सुपीक जमीन करण्याची गरज दोन्ही नेत्यांना आहे. अन्यथा, गेस्ट हाऊसकांडाच्या आठवणींवर माती टाकण्याचा प्रयत्न मायावती यांनी कधीच केला नसता. कारण त्या कणखर आणि जिद्दी स्वभावाच्या आहेत. माघार घेणं त्यांना येत नाही. अशात तब्बल 24 वर्षांनंतर मायावती आणि मुलायमसिंह यादव एकाच मंचावर आले. निमित्त होतं मैनपुरी मतदारसंघातील प्रचार रॅलीचं, जिथून खुद्द मुलायमसिंह यादव निवडणूक लढत आहेत.

यावेळी मंचावर मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि मायावती एकत्र दिसून आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही या रॅलीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना मुलायमसिंह यादव म्हणाले, “आमची भाषणं तुम्ही अनेकदा ऐकली आहेत. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. तुम्ही मला विजयी करा. याआधीही तुम्ही मला विजयी केलं आहे. यावेळीही विजयी करा. मायावतीजी आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला साथ दिली मी त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. मला आनंद आहे की, त्या आमच्यासोबत आहेत. आमच्या मतदारसंघात त्या आल्या आहेत’, असे ते म्हणाले. यानंतर मायावती यांनीसुद्धा मुलायमसिंह यादव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या की, मुलायमसिंह यादव नरेंद्र मोदींसारखे बनावट मागासवर्गातले नाहीत. ते खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांचे नेते आहेत.

मायावती आणि मुलायमसिंह यांची नावे एकत्र आली की गेस्ट हाऊस प्रकरणाची आठवण होणं स्वाभाविक आहे. मायावती यांनी आपल्या भाषणामध्ये गेस्ट हाऊस प्रकरणाचा उल्लेखही केला. हे प्रकरण विसरून एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कधीकधी देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे मायावती यांनी सांगितलं. मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जबरदस्त हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, इथले लोक मुलायमसिंह यांना आपले खरे नेते मानतात. मोदींनी गुजरातमध्ये आपल्या जातीला मागासवर्गात समाविष्ट केलं आणि आता ते मागास जातींच्या हक्कांवर अतिक्रमण करत आहेत, हे सर्वांना माहिती आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागास म्हणवून त्याचा फायदा 2014च्या निवडणुकीत घेतला आणि अजूनही ते याचा फायदा घेत आहेत. ते कधीही मागासवर्गाचं भलं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकत नाहीत. दलित आणि मागासवर्गीयांची लाखो पदं रिक्त आहेत, बेरोजगारी वाढत आहे. या निवडणुकीमध्ये “असली आणि नकली’ यांची ओळख होण्याची गरज आहे. तुमचं हित कोणता खरा नेता करू शकतो याची पारख तुम्ही करा. ही पारख करूनच तुम्ही अशा खऱ्या नेत्याला निवडून संसदेत पाठवा, ज्यांचा वारसा अखिलेश यादव प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सांभाळत आहेत. केंद्रातील भाजपसुद्धा भांडवलशाही आणि सांप्रदायिकतेचा प्रसार करत आहे. यावेळेस ते नक्की सत्तेतून बाहेर जातील. या निवडणुकीमध्ये नाटकबाजी, चौकीदारी, जुमलेबाजी चालणार नाही.

भाजपला आता कोणत्याही स्थितीत यश मिळणार नाही. लहान-मोठे चौकीदार एकत्र येऊन कितीही ताकद पणाला लावली तरी त्यांना यश मिळणार नाही. अच्छे दिन येण्याचं आपलं आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून लोकांचं लक्ष विचलित करून त्यांची दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत.
केंद्रामध्ये सत्तेत आल्यावर 100 दिवसांच्या आत परदेशातून काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाला 15 लाख रुपये दिले जातील, असं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यावेळेस पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींनी निवडणुकीत आश्‍वासन दिलं होतं. नरेंद्र मोदी भरपूर स्वप्नं दाखवतात. निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि भाजप मतांसाठी प्रलोभनांनी भरलेली आश्‍वासनं देतील. या आश्‍वासनांमध्ये तुम्ही वाहून जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केलं. 17 व्या लोकसभेची निवडणूक अन्य कारणांप्रमाणे याही कारणासाठी इतिहासात ओळखली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.