पुणे – मोक्कातील फरार आरोपी रविंद्र बऱ्हाटे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याने धनकवडीमधील एकता सहकारी गृहरचना संस्थेची जमिन बळकावण्याचा कट रचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन राजेंद्र साठे यांनी फिर्याद दिली आहे.
रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (लूल्लानगर), विजय मांगीलाल नागोरी (शंकरशेठ रोड), युवराज सुरेश कोतवाल(लक्ष्मी रोड), सुबोध त्रलोकचंद ओसवाल(44,रा.गुलटेकडी), मॅक ड्रॉप इंडिया लिमिटेड(शनिवार पेठ) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सन 2006 ते एप्रिल 2021 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हे एकता सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत. संस्थेची धनकवडी येथे एक एकर एक आर जमिन आहे. ही जमिन बळकावण्यासाठी आरोपींनी कट रचला होता.
दरम्यान मध्यंतरी उच्च न्यायालयाने सुध्दा साठे हेच संस्थेचे चेअरमन असल्याचा निकाल दिला होता. असे असतानाही आरोपींनी कट रचून संस्थेचे शिक्के, लेटर हेड आणी प्रोसिडिंग बुक बनावट तयार केले. यानंतर संस्थेची सभा झाल्याचे भासवून तशी प्रोसेडिंग बुकमध्ये नोंद केली. यानंतर तलाठ्यांकडे जाऊन रविंद्र बऱ्हाटे हा संस्थेचा सेक्रेटरी व सुधाकर खवले हा चेअरमन असल्याचे भासवले. त्याप्रमाणे तलाठ्याकडून सात बाराच्या उताऱ्यावर स्वत:ची नावे लावून घेतली.
यानंतर ही जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच सुबोध ओसवाल व मॅक ड्रॉफ इंडिया लिमीटेड हे संस्थेचे सभासद नसतानाही त्यांनी बनावट लेटर हेड व शिक्का बनवला. यानंतर संस्थेची कोणतीही सभा झाली नसताना ती झाली असल्याच भासवत विजय मांगिलाल नागोरी व सुबोध त्रिलोकचंद ओसवाल हे चेअव सेक्रेटरी असल्याचे सभासदांना भासवले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करत आहेत.