पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाइन परीक्षा सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी आतापर्यंत 13 हजार विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. यातील 9 हजार विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यात तांत्रिक अडचणी आल्याचे दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षेत अनुपस्थित दाखविण्यात येत आहे.
त्यामुळे हे विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार की त्यांची परीक्षा घेतली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठामार्फत दि. 10 एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास येत आहे. तथापि, दि. 16 एप्रिल पासून रोज 100 पेक्षा जास्त विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधून परीक्षेसाठी लॉगइन होत नाही, अशा तक्रारी केल्या होत्या.
मात्र, या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा न दिल्याने त्यांची अनुपस्थिती लागलेली आहे. त्यामुळे सध्या तरी हे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत अशीच स्थिती आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात या तक्रारी आल्याने परीक्षा विभागाने 16 ते 20 एप्रिल दरम्यान परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 25 एप्रिल पर्यंत त्यांच्या अडचणी नोंदविण्याची मुदत दिलेली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण 13 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यापैकी चार हजार तक्रारी सोडविलेल्या प्रश्नांपैकी कमी प्रश्न सबमिट झाले आहेत, उत्तर सेव्ह झाले नाही, कमी गुण पडले अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. नऊ हजार तक्रारी या लॉगइन न झाल्यामुळे परीक्षा देता आली नसल्याच्या आहेत.
विद्यापीठाकडे आलेल्या 13 हजार तक्रारींची छाननी केली असता त्यामध्ये नऊ हजार तक्रारी लॉगइन न झाल्याच्या संदर्भातील आहेत. हे विद्यार्थी आमच्या दृष्टीने अनुत्तीर्ण आहेत. मात्र विद्यार्थ्यां खरेच लॉगइन होता आले नाही का? त्यांना नेमक्या काय अडचणी आल्या याची योग्य पद्धतीने तपासणी करून त्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.