पुणे – परवानगी न घेताच गल्लीबोळांत गतिरोधक उभारले गेले आहेत. त्याची रचना, लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये तफावत आढळते. गतिरोधक फलकदेखील नसतात. असे अनियोजित गतिरोधक पाठीच्या आजारांसह वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहेत. शहरातील वाहतुकीचा वेग पाहता, “गतिरोधक नकोच’ अशी भूमिका वाहनचालक मांडत आहेत. शहरातील रहिवासी परिसर आणि संबंधित रस्ते यावरील गतिरोधकाचे सामाजिक, तांत्रिक ऑडिट होण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
रात्री जास्त त्रास
शहरात बहुतांश ठिकाणी स्पीडब्रेकर्स बेकायदेशीरपणे बांधण्यात आले आहेत. त्यावर ना पांढरी पट्टी लावण्यात आली आहे, ना आधी फलक लावून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्पीडब्रेकर दिसत नसल्याने अपघात होतात. अगदी जवळ पोहोचेपर्यंत गतिरोधक दिसतच नाही. घाईघाईत ब्रेक लावल्याने वाहने घसरण्याची शक्यता असते.
या ठिकाणी स्पीड ब्रेकर बनवता येतात
इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमांनुसार, हाय-वेवर रेल्वे क्रॉसिंग, अपघात प्रवण क्षेत्र, तीव्र वळणे, अप्रोच रोड, पेट्रोल पंप इत्यादींवर विहित मानकांनुसार रंबल स्ट्रिप्सला परवानगी आहे. यामध्ये वाहनांना धक्का लागत नाही आणि वेगही कमी असतो. विनाअडथळा वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि अपघात कमी करण्यासाठी हे गतिरोधक कमी होण्याची गरज आहे.
कंत्राटदारांचे पोट भरण्यासाठी!
नेत्यांच्या दबावाखाली आणि वाहतूक पोलिसांचा ळरवाना नसतानादेखील महानगरपालिका मनाप्रमाणे कसेही, कोठेही गतिरोधक उभारते. डांबरीकरण झालेल्या रस्त्यात गतिरोधक बांधून नवीन रस्ते नादुरुस्त आणि ओबडधोबड केले जातात. तरीही, कंत्राटदारांना पूर्ण पैसे दिले जातात. नागरिकांच्या तक्रारी आल्यावर असे अनधिकृत गतिरोधक काढण्यासाठी नवीन निविदा मागवण्यात येतात. यामुळे सामान्य जनतेने कर रुपाने दिलेला पैसा वाया जातो, हे पालिका प्रशासनाला लक्षात कसे येत नाही?, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.
…म्हणून गतिरोधक नकोत
- अचानक ब्रेक लागल्याने वाहतुकीची कोंडी.
- अचानक ब्रेक लागल्याने दुचाकीस्वार घसरण्याची भीती
- वेगवान रुग्णवाहिकेतील रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका
- अग्निशमन दल, पोलीस वाहन, रुग्णवाहिका यासह आपत्कालीन वाहने वेळेवर पोहोचण्यास अडथळे
- गर्भवतींना प्रवासावेळी सर्वात जास्त धोका
गतिरोधक उभारणीचे नियम
- नियमानुसार गतिरोधकांची उंची 10 सेंटिमीटर, लांबी 3.5 सेंटिमीटर, मीटर वर्तुळकार क्षेत्र 17 मीटर असते.
- गतिरोधक शाळा, महाविद्यालय किंवा मुलांची वर्दळ असेल अशा ठिकाणीच असावा.
- गतिरोधक येण्याआधी 40 मीटर अंतरावर सूचनाफलक रस्त्यावर असावा.
- वर्दळ असलेल्या रस्त्यांवर पांढरे पट्टे असलेले दिशादर्शक गतिरोधक असावेत.
- गतिरोधक उभारल्यावर त्यावर प्लॅस्टिक पेंट, पट्ट्या आवश्यक