पुणे – आज विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची वर्ष 2021-22 साठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठी सभा झाली. ऍड. शशिकांत प्रभाकर कुलकर्णी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. अनिल भरतशेठ गाडवे यांची अध्यक्ष पदावर व सीए मनोज वसंत साखरे यांची उपाध्यक्ष पदावर निवड झाली. या दोन्ही निवडणूका बिनविरोध झाल्या.
अनिल गाडवे हे पुण्यातील प्रसिध्द काका हलवाई या फर्मचे भागीदार असून, मनोज साखरे हे चार्टड अकौंटट आहेत. बॅंकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना गाडवे म्हणाले की, आपल्या बॅंकेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने सभासदांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार असल्याचे तसेच करोनामुळे बॅंकेबाबत निर्माण झालेली मरगळ झटकून एनपीए कमी करावयाचे आहेत. त्याकरीता सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. या सभेत बॅंकेचे संचालक सुनिल रुकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राम सरव्यवस्थापक दराडे यांनी आभार मानले.