हैदराबाद – आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 50 वर्षांचे होते. रेड्डी हे त्यांच्या राहत्या घरी सकाळी अचानक कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मेकापती गौतम रेड्डी यांना कुटुंबीयांनी सकाळी पावणे आठ वाजता रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते. त्यांना श्वास घेता येत नव्हता, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती अपोलो रूग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
दरम्यान, रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकुरु विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळातील उद्योग, वाणिज्य, आयटी आणि कौशल्य विकास विभाग सांभाळत होते.