… आणि आम्ही सारे बचावलो!

संदीप राक्षे

सातारा – कुडकुडत्या थंडीतून उपाशीपोटी 22 विद्यार्थी आणि मी कोयनानगर- कराड- सातारा असा प्रवास करून पहाटे साडेतीन वाजता साताऱ्यात पोहचलो. पहाटे सव्वाचार वाजता आठ रिश्‍टर स्केलच्या भूकंपाने कोयनानगरची स्मशानभूमी झाली. ज्या पोलीस क्वार्टरमध्ये आम्ही मुक्कामी होतो ती इमारत जमीनदोस्त झाली होती.

कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला गुरूवारी 11 डिसेंबर 1967 रोजी बावन्न वर्ष पूर्ण होत आहेत. येथील आयटीआय संस्थेत 35 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावलेले विठ्ठलराव जाधव 52 वर्षापूर्वीची थरारक आठवण दै. “प्रभात’जवळ उलगडत होते. मी कोल्हापूरवरून साताऱ्यात धंदेवाईक शिक्षण शाळेत स्टेनोग्राफर या कोर्ससाठी इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून ऑक्‍टोबर 1967 मध्ये रुजू झालो, प्रा. जाधव ती थरारक आठवण पुढे सांगू लागले. त्यावेळी दळणवळणाची कोणतीच साधने नसताना 22 विद्यार्थी व विद्यार्थीनींची सहल मी 11 डिसेंबर1967 रोजी कोयनानगरला घेऊन गेलो होतो. धरण परिसर व जंगल भागाची भ्रमंती केल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मुक्कामाला कोठेच जागा मिळेना.

अखेर माझे पोलीस मित्र शेख यांनी मुलामुलींसाठी कोयनानगर येथील पोलीस क्वार्टरच्या दोन रुम उपलब्ध करून दिल्या. रात्री साडेनऊ वाजता आम्ही सर्वजण शानभाग यांच्या कॅन्टीनमध्ये जेवायला गेलो. वीस जणांचे जेवण बनवायचे असल्याने अर्धा तास थांबायला सांगितले. त्याच वेळी कोयनानगर स्टॅंन्डमध्ये ब्रेकडाऊन दुरूस्त झालेली चिपळूण- कराड बस उभी होती. तेव्हा का कोणास ठाऊक येथून पटकन निघावे, असे वाटल्यानंतर जेवणाचा बेत रद्द करून आम्ही सर्वजण त्या एसटीने कराडमध्ये रात्री दीड वाजता पोहचलो. दिवसभराची पायपीट पोटात अन्नाचा कण नाही, मी अचानक निघण्याची घाई केल्याने विद्यार्थी माझ्यावर वैतागले होते. कराडमध्येसुध्दा काहीच व्यवस्था न झाल्याने सर्वांनाच उपाशी रहावे लागले.

कराड स्टॅन्डवरून कोल्हापूर- पुणे बस मिळून पहाटे सव्वातीन वाजता आम्ही पोवई नाक्‍यावर उतरलो. सर्व विद्यार्थी सुरक्षितपणे पाठवल्यानंतर मी पहाटे चार वाजता सदरबझारमधील घरी पोहचलो. अंथरुणावर पहुडल्यावर जरा डोळा लागला असेल तोच पहाटे चार वाजून वीस मिनिटानी घराच्या भिंती अचानक जोरजोरात हादरू लागल्या, मी व माझे काका जीवांच्या आकांताने बाहेर धावलो. सारा प्रकार तीन चार मिनिटांचा पण संपूर्ण सातारा शहर जागे झाले होते. हा भूकंपाचा प्रकार असल्याचे माझ्या लक्षात आले. सकाळी साडेसात वाजता मी घाईघाईने कॉलेज गाठले, तेव्हा प्राचार्य जे. एस. भुतकर आमच्यासाठी चिंतित होते. मी व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे कळल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.

कोयनानगरला मोठा भूकंप झाल्याची खबर साताऱ्यात आली. त्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेल्याचे सांगण्यात आले. प्राचार्यांच्या परवानगीने मी स्वयंसेवक म्हणून कोयनानगरला मदतीसाठी रवाना झालो. ज्या पोलीस क्वार्टरमध्ये आम्ही आश्रय घेतला होता, ती इमारत जमीनदोस्त झाली होती. सगळ्या कोयनानगरची स्मशानभूमी झाली. घरांची प्रचंड नासधूस झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई स्वतः मदतीसाठी रस्त्यावर उतरले. त्या दिवशी मी चिपळूण कराड एसटीने यायची घाई केली नसती तर नियतीने आमचा घास घ्यायचे नक्की केले होते. पण माझी पूर्वपुण्याई नशिबाने मी आणि आम्ही सारे वाचलो. 52 वर्षांपूर्वीची ही थरारक आठवण सांगताना जाधव सरांचे डोळे पुन्हा पाणावले होते. ज्या विद्यार्थ्यांनी सरांच्या नावाने त्रागा केला, त्यांनीसुध्दा भूकंपाची बातमी ऐकल्यावर मला धन्यवाद दिल्याची आठवण सरांनी सांगितली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here