पिंपरी – केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांसह शहरातील अनुदानित अशा 270 शाळेतील 1 लाख 50 हजार 756 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 हजार 235 विद्यार्थ्यांना विविध आजार असल्याचे समोर आले. तर 231 विद्यार्थ्यांना ऍपेडिंक्स, ह्दयरोग, हार्निया, किडनी, डोळ्यांचे आजार, कान, नाक, घशाचे विविध गंभीर असल्याचे समोर आले. यासारख्या गंभीर आजाराचे निदान होताच शहरातील नामांकित रूग्णालयात केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील धोका टळला असून सर्व मुले व्यवस्थित आहेत.
शहरात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा 128 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 48 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासह शहरातील 142 अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत एप्रिल 2022 ते मार्च 2023 या एका वर्षांच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तपासणीत मुलांचे डोळे, ह्दय, पोट, कान, नाक, घसा यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 4 हजार 235 विद्यार्थ्यांना विविध समस्या असल्याचे तपासणी आढळून आले. चार हजार 4 विद्यार्थ्यांना गोळ्या औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गंभीर आजार असलेल्या 231 विद्यार्थ्यांवर शहरातील नामांकित मल्टी स्पेशालिटी रूग्णालयात केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये गोर-गरीब नागरिकांची तसेच झोपडपट्टी भागातील मुलांचा जास्त समावेश आहे. आरोग्य तपासणीमुळे मुलांवर वेळीच आणि मोफत उपचार करणे शक्य झाले आहे. भविष्यातील धोका टळल्यामुळे संबंधित मुलांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे
.
शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, केंद्र सरकारच्या बाल स्वास्थ मिशन कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा डेटा संग्रहित करण्यात आला आहे. तसेच आगामी शैक्षणिक वर्षांपासून वर्षांतून दोनदा विद्यार्थ्यांची महापालिकेच्या संबंधित परिसरातील रूग्णालयामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
– संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग