पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात पोलिसांच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांना सभागृहाच्या बाहेर भर पावसात थांबावे लागले. एकीकडे सभागृहात व्यासपीठावर विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करून त्यांचा गौरव केला जात असताना, पोलिसांनी “प्रोटोकॉल’च्या नावे विद्यार्थ्यांना रोखून धरले.
पुणे विद्यापीठातील सभागृहाबाहेर उपस्थित असणाऱ्या प्राध्यापक, निमंत्रित, पत्रकार आणि छायाचित्रकारांना आता जाण्यास पोलिसांनी मनाई केली. याबाबत विचारणा केल्यावर विद्यापीठाच्या प्रशासनाने आता न सोडण्याच्या सूचना दिल्याचे उत्तर दिले. मात्र, अशा कोणत्याही सूचना प्रशासनाने दिल्या नसतानाही पोलिसांनी विद्यार्थ्यांना आत जाण्यापासून रोखले.
विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील पदवी प्रदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. राज्यपाल उपस्थित असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. त्याचवेळी पावसामुळे अनेकांना सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला. यावेळी सभागृहाबाहेर उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना आत जाण्यास मनाई केली.
त्यामुळे सभागृहात बसायला पुरेशी जागा असतानाही सर्वानाच बाहेर पाऊस पडत असताना थांबावे लागले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन अधिकाऱ्यांना बाहेर बोलवल्यानंतर पत्रकार आणि छायाचित्रकारांना आता सोडले. मात्र, विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेरच थांबावे लागले. बाहेर गर्दी वाढल्यानंतर काहींना सभागृहात सोडण्यात आले.