जगभरामध्ये करोना व्हायरसचा कहर दीड वर्षापासून कायम आहे. सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केल्याने चित्रपटसृष्टीचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आहे. यासोबतच सिनेमागृह बंद असल्याने अनेकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे.
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सच्या “फइंडिंग अनामिका’ वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तसेच माधुरीची पहिलीवहिली वेबसिरीज असून तिच्यासोबत संजय कपूर, मानव कौर यांची वर्णी लागली आहे.
याचप्रमाणे अभिनेता अजय देवगणसुद्धा ओटीटीवर दमदार एंट्री करणार आहे. “लुथर’ या ब्रिटिश वेबसिरीजच्या अधिकृत रिमेकद्वारे अजय देवगण “रुद्रा’ या वेबसिरीजमध्ये काम करणार आहे.
तसेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत “फॉलन’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. शिवाय शाहिद कपूरदेखील ऍमेझॉन प्राइम या माध्यमातून डेब्यू करणार असल्याचे बोलले जात आहे.
“लेगसी’ या वेबसिरीजद्वारे अभिनेता अक्षय खन्नादेखील डिजिटल डेब्यूसाठी तयार झाला असल्याचे समजते.