Amol Muzumdar : एकेकाळचा ‘पुढचा तेंडुलकर’ अमोल मुझुमदार

Updated On:
Amol Muzumdar : एकेकाळचा ‘पुढचा तेंडुलकर’ अमोल मुझुमदार

Amol Muzumdar : रविवारी रात्री नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडिअमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. या कामगिरीच श्रेय जितकं हरमनप्रीत कौरच्या संघाला जातं, तितकच पडद्यामागे राहून ही टीम घडवणारे मुंबईचे प्रतिभावान खेळाडू अमोल मुझुमदार यांचं आहे. अमोल मुझुमदार कोण आहेत? त्यांना भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची कधीच संधी का नाही मिळाली? या बद्दल जाणून घ्या.

तुमच्याकडे टॅलेंट असलं म्हणून तुम्हाला सर्वकाही मिळतं असं होतं नाही. त्याला नशिबाची सुद्धा साथ लागते. कधीकधी टॅलेंट असून सुद्धा योग्य व्यासपीठ मिळत नाही. पर्यायाने त्या व्यक्तीसोबत त्या क्षेत्राचं सुद्धा नुकसान होतं. या वर्ल्ड कप विजयानंतर तुम्ही सोशल मीडियावर खासकरुन इन्स्टाग्राम पाहिलं, तर एक चेहरा तुम्हाला प्रकर्षाने दिसेल, तो म्हणजे या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाचे हेड कोच अमोल मुझुमदार यांचा. इन्स्टाग्रामवर अमोल मुझुमदार यांचा ग्रेटनेस, मनाचा मोठेपणा दाखवून देणारे अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. 90 च्या दशकातील सच्चा क्रिकेटप्रेमींना अमोल मुझुमदार हे नाव माहित नाही, असं होणार नाही.

एकेकाळी मुंबईला भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जायचं. मुंबईने अनेक महान, ग्रेट क्रिकेटपटू या देशाला दिले. यात सर्वसामान्यांच्या ओठांवर असलेली नावं म्हणजे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर. यात अजून एका नावाचा समावेश होऊ शकला असता, पण दुर्देवाने असं घडलं नाही. ते नाव म्हणजे अमोल मुझुमदार. लोक त्यांना पुढचा सचिन तेंडुलकर म्हणायचे याला कारण त्यांची क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरी. अमोल मुझुमदार यांचा क्रिकेटमधला प्रवास पाहिला, तर एक सच्चा क्रिकेटप्रेमी म्हणून तुम्हाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही.

कोण आहेत अमोल मुझुमदार?
अमोल मुझुमदार यांचा जन्म 1974 मध्ये झाला. मुंबईत जन्मलेले अमोल मुझुमदार दादरच्या शिवाजी पार्क परिसरात लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. शिवाजीपार्क मैदानातच त्यांनी रमाकांत आचेरकर सरांच्या नजरेखाली क्रिकेटचे धडे गिरवले. अमोल मुझुमदार यांच्याकडे क्रिकेटचं उत्तम तंत्र होतं. ते त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा रणजी टुर्नामेंटमध्ये सिद्धही केलं.

1988 साली हॅरिस शिल्ड स्पर्धेच्यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची पार्टनरशिप करुन मोठा रेकॉर्ड रचला. शालेय क्रिकेटमध्ये हॅरिस शिल्ड मानाची स्पर्धा मानली जाते. सचिन आणि विनोदने तब्बल दोन दिवस बॅटिंग केली. दोघांच्या प्रतिभेची मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. पुढे 1989 साली सचिन तेंडुलकरला पाकिस्तान दौऱ्यात संधी मिळाली. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी मैदानावर खेळत होते. त्यावेळी एक फलंदाज पॅड बांधून बसलेला तो म्हणजे अमोल मुझुमदार.

अमोल मुझुमदार यांना तेंडुलकर म्हणायचे
रणजी स्पर्धेत खोऱ्याने धावा करुनही अमोल मुझुमदार यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. अमोल मुझुमदार यांचा खेळ पाहून त्यांना पुढचं तेंडुलकर म्हटलं जायचं. पण मुंबई क्रिकेटमधला हा तेंडुलकर कमनशिबी ठरला. त्याच्या डोक्यावर भारतीय क्रिकेट संघाची कॅप कधी दिसलीच नाही.

 

अमोल मुझुमदार यांची कामगिरी
अमोल यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहिली, तर थक्क व्हायला होतं. 171 सामन्यात अमोल मुझुमदार यांच्या नावावर 11167 धावा आहेत. यात 30 सेंच्युरी, 60 हाफ सेंच्युरी आहेत. 48 ची त्यांची सरासरी आहे. हरियाणा विरुद्ध पदार्पणाच्या रणजी सामन्यातच अमोल मुझुमदार यांनी 260 धावांची खेळी केलेली. पहिल्या चार सीजनमध्ये मुझुमदार यांचा एव्हरेज होता, 83.78. सात देशांतर्गत सीजनमध्ये त्यांची सर्वात कमी सरासरी होती 46.35. या कामगिरीमुळेच त्यांना तेंडुलकर म्हटलं जायचं.

अमोल मुझुमदार यांचा भारतीय संघासाठी का विचार झाला नाही?
90 च्या दशकातील मुंबई क्रिकेट संघ दिग्गजांनी भरलेला होता. सचिन तेंडुलकर, विनोंद कांबळी, समीर दिघे, साईराज बहुतुले, पारस म्हाब्रे, ॲबी कुरुविला, निलेश कुलकर्णी, वसिम जाफर, रमेश पोवार आणि जतीन परांजपे यातल्या बहुतांश खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. अपवाद फक्त अमोल मुझुमदारचा.

Amol Mazumdar

भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याची संधी न मिळण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे फॅब फोर. अमोल मुझुमदार रणजी गाजवत असताना सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाकडून दमदार प्रदर्शन करत होते. त्यामुळे मधल्या फळीसाठी नव्या फलंदाजाचा विचार होण्याची शक्यता कमी होती. परिणामी त्याचा फटका अमोल मुझुमदार यांना बसला.

… म्हणून कोच बनले
भले अमोल मुझुमदार यांच्या डोक्यावर टीम इंडियाची कॅप आली नाही. पण ते इतकं खेळले की, क्रिकेटची उत्तम समज त्यांच्यामध्ये आहे. एखाद्या प्लेयरची क्षमता ओळखणं, त्याच्याशी संवाद साधणं यामुळे ते नैसर्गिक शिक्षक बनले. उत्तम कॅप्टन आणि कोच तोच असतो, जो खेळाडूच्या कौशल्याचा मैदानावर अचूक वापर करुन घेऊ शकतो. याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये आला.

2023 साली बीसीसीआयने त्यांची भारतीय महिला क्रिकेट संघाचे हेड कोच म्हणून नियुक्ती केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसलेल्या व्यक्तीची इतक्या मोठ्या पदावर निवड केल्यामुळे अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. पण अमोल मुझुमदार यांनी भारतीय महिला संघाला त्यांचा पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देत सगळ्या टीकाकारांची बोलती बंद केली.

रडत बसण्यापेक्षा करून दाखवलं
अमोल मुझुमदार हे शांत, संयमी स्वभावाचे. रणजीमध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स असूनही एकदाही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. म्हणून अमोल मुजुमदार यांनी कधी तक्रार केली नाही. उलट त्यांनी त्यांचं पॅशन खेळाडू घडवण्यासाठी वापरलं. खरतर ज्या वयात त्यांना संधी मिळायला पाहिजे होती, त्या वयात त्यांना ती मिळाली नाही. पण म्हणून हार मानून रडत बसण्याऐवजी ते काम करत राहिले आणि त्यांनी आज सगळ्या भारतीयांना अभिमानाने मान उंचावण्याची संधी दिली.

आणखी संबंधित बातम्या

Strait of Hormuz: होर्मुझवरून ट्रम्प यांनी घेतलेल्या यू-टर्नचा भारताला काय फायदा? ; इंधनाचे दर कमी होतील की वाढतील?

2026-04-01 12:16:11

Strait of Hormuz: होर्मुझवरून ट्रम्प यांनी घेतलेल्या यू-टर्नचा भारताला काय फायदा? ; इंधनाचे दर कमी होतील की वाढतील?

LPG Gas Price Hike : अखेर तेच घडलं ! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ ; घरगुती सिलिंडरविषयी काय परिस्थिती?

2026-04-01 11:20:00

LPG Gas Price Hike : अखेर तेच घडलं ! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ ; घरगुती सिलिंडरविषयी काय परिस्थिती?

Narendra Modi : "युद्धाच्या परिस्थितीत भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2026-03-31 22:29:45

Narendra Modi : "युद्धाच्या परिस्थितीत भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Anil Gurav : क्रीडा विश्वावर शोककळा ! दिग्गज क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन

2026-03-31 21:23:38

Anil Gurav : क्रीडा विश्वावर शोककळा ! दिग्गज क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन

Raghav Chadha : जबाबदारी फक्त आईचीच का? नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी, इतर देशांमध्ये परिस्थिती काय...

2026-03-31 19:37:33

Raghav Chadha : जबाबदारी फक्त आईचीच का? नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी, इतर देशांमध्ये परिस्थिती काय...