औरंगाबाद – शिवसेनेतील शिंदे गट आणि उद्धव टाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गट तयारीला लागले आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. अशातच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या हिंदु गर्व गर्जना यात्रेला टोला लगावला आहे. तसेच अब्दुल सत्तारांवरही निशाणा साधला आहे.
दानवे यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा एक जाळीची टोपी घातलेला फोटो ट्विट करत म्हंटले की, “सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!!” दरम्यान या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दानवे यांनी ट्विट केलेल्या फोटोत संदीपान भुमरे यांचा एका कार्यकर्त्यासोबत डोक्यावर जाळीची टोपी घातलेला फोटो दिसत आहे.
सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी!
व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है!काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना!
व्वा! ओक्के!!#मिंधेगट pic.twitter.com/mHv5CvO955
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 1, 2022
दरम्यान, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. मेळाव्यात दोन्ही गटातील नेते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.