मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी.वय.पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे त्यांचा उल्लेख आता यापुढे डॉ. एकनाथ शिंदे असा करण्यात येणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये या पदवीप्रदान समारंभाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना चिमटे काढले आहेत.
एकनाथ शिंदे याना डी.लिट पदवी मिळाल्यानंतर त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना “मुलगा श्रीकांत शिंदे यांनी याच डी. वाय. पाटील संस्थेतूनच एमबीबीएस आणि त्यानंतर एमएस पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच विद्यापीठाने डी. लीट पदवीने सन्मान केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. सन्मान करण्यासाठी पात्र आहे, की नाही माहिती नाही. पण, गौरव किंवा सन्मान होत असताना मागचा काळही आठवायचा असतो,”असे म्हटले.
तसेच “कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल मनात जिद्द आणि खंतही होती. मात्र, तीन वर्षापूर्वी बीएची पदवी घेतली. त्यात चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो. अजूनही पुढं शिकायचं आहे. मधले ऑपरेशन झाले, त्यात ते राहून गेलं,” असे सांगत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना चिमटे काढले.
यावेळी त्यांनी “कुलपती विजय पाटील म्हणाले, मी आता तुम्ही डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो. समाजात किंबहुना इतके वर्ष काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे. पण, विनम्रता माझ्यासाठी महत्वाचं आहे. शेवटी प्रत्येक माणसाने विनम्र असलं पाहिजे,”असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.