रिल्स बनवणाऱ्यांनो सावधान ! केदारनाथनंतर आता ‘सुवर्ण मंदिर’ समितीने घेतला मोठा निणर्य; मंदिर परिसरात फोटो-व्हिडिओ घेण्यास घातली बंदी

Golden Temple । Amritsar : अमृतसर येथील ‘सुवर्ण मंदिराच्या’ परिसरात व्हिडिओ तयार करण्यास अथवा फोटो घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज म्हणजे शुक्रवार पासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना शिरोमगणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अर्थात एसजीपीसीचे सदस्य भगवंत सिंह सियालका म्हणाले की, ‘इंटरनेट मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर या पवित्र स्थळाचा उपयोग पिकनिक प्लॅटफॉर्म किंवा सेल्फी पॉइंटसारखा केला जातो आहे.
कधी कधी सोशल मीडियावर अशा रिल्स पहायला मिळतात की ज्या योग्य नाहीत. त्यांना मर्यादांचे भान नसते. त्यामुळे कारवाई करावी लागते.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हरमंदिर साहीब या नावानेही ओळखले जाते. शीख धर्मियांसाठी हे सगळ्यांत पवित्र स्थळ किंवा सगळ्यांत प्रमुख गुरूद्वारा आहे. रोज हजारो भाविक जगभरातून येथे येत असतात. असं ते यावेळी म्हणाले.
केदारनाथ मंदिरामध्ये मोबाईल बंदी
केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत. यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत.
काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे.
फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यास मनाई
केदारनाथ हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आयुष्यात किमान एकदा तरी येथे जाण्याची अनेकांची इच्छा असते. पवित्र केदारनाथ धाम चारधामपैकी एक महत्त्वाचं स्थान आहे.
पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर केदारनाथचे व्हिडीओ, रिल्स आणि फोटो प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.





