Dainik Prabhat annual sports competition 2025 : क्रिकेटमध्ये ‘योद्धाज’ संघ ठरला विजेता तर ‘डिजिटल’ प्रभात उपविजेता

पुणे – दैनिक प्रभातच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये (Dainik Prabhat annual sports competition 2025) योद्धाज संघाने विजेतेपद पटकावले तर डिजिटल प्रभात संघ उपविजेता राहिला.
येथील डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये प्रभात योद्धाज संघाने डिजिटल प्रभात संघाला ७ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना डिजिटल प्रभात संघाने निर्धारित ६ षटकांत ६ बाद ४३ धावा केल्या. यामध्ये सौरभ मानेने १२ तर प्रीतम पुरोहितने ९ व प्रशांत शिंदेने ८ धावांचे योगदान दिले. विजय ससाणेने २ तर चंद्रकांत बोरुडे व अरुण दिवटे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रभात योद्धाज संघाने ४ षटकांत ३ बाद ४४ धावा करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये श्रीकांत तडकेने १७, अमोल रावसेने नाबाद १६ व अरुण दिवटेने नाबाद ३ धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. विजेत्या संघाला दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांच्या हस्ते करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरीने वैयक्तिक स्पर्धामध्ये देखील कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
इतर स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे (विजेता, उपविजेता):
बॅडमिंटन : रोहन मुझुमदार, मुनेश गुरम
कॅरम : सुनील राऊत – संजय दाणी, शिरीष समुद्र-माधव दिवाण
बुद्धिबळ : संदीप देसाई, प्रवीण थूल
लिंबू चमचा : किरण खेकाळे, सागर येवले
संगीतखुर्ची : संदीप बधाले, श्रेया खटावकर






