IND W vs SA W : महिला क्रिकेटला सुवर्णकाळ! विश्वचषक विजेत्याला मिळणार विक्रमी बक्षीस रक्कम, उपविजेताही होणार मालामाल

IND W vs SA W Prize Money For The Winner and Runner up : ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला उपांत्य फेरीत पराभूत करून भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. या नेत्रदीपक विजयामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या यशाने केवळ अंतिम फेरीतील प्रवेशच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांची कमाईही सुनिश्चित केली आहे.
अंतिम फेरीतील प्रवेशामुळे मोठी कमाई निश्चित –
विक्रमी ३३९ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून विजय मिळवल्यामुळे, भारतीय संघाला सुमारे १९.८५ कोटी रुपये (जवळपास २० कोटी) बक्षिसाची रक्कम मिळणे निश्चित झाले आहे. मात्र, आता खेळाडूंचे संपूर्ण लक्ष अंतिम फेरीतील ट्रॉफीवर आहे. जर भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर संघाच्या खात्यात सुमारे ३९.७० कोटी रुपयांची प्रचंड रक्कम जमा होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी महिला विश्वचषकासाठीच्या बक्षिसाच्या रकमेत ऐतिहासिक वाढ केली आहे.
विश्वचषकातील विक्रमी बक्षिसाची रक्कम
Two nations. One dream 🇮🇳🇿🇦
Harmanpreet Kaur and Laura Wolvaardt stand on the precipice of #CWC25 history 🏆 pic.twitter.com/Kyq4WBSjqe
— ICC (@ICC) November 1, 2025
एकूण बक्षीस: बक्षीस म्हणून एकूण १३.८८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ११६ कोटी रुपये) निश्चित करण्यात आले आहेत.
वाढ: ही रक्कम मागील २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील एकूण बक्षीस रक्कम (३.५ दशलक्ष डॉलर्स) च्या तुलनेत जवळपास २९७% अधिक आहे.
‘जेंडर पे-पॅरिटी’ धोरण लागू –
या विश्वचषकाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, आता महिला आणि पुरुष दोन्ही विश्वचषकांमध्ये समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. हा निर्णय आयसीसीच्या ‘जेंडर पे-पॅरिटी पॉलिसी’चा एक भाग आहे, ज्याचा उद्देश महिला आणि पुरुष खेळाडूंना समान आर्थिक सन्मान देणे हा आहे.
विजेता आणि उपविजेता संघांना मिळणारी रक्कम:
- विजेता -४.४८ दशलक्ष डॉलर्स – सुमारे ३९.७ कोटी रुपये
- उपविजेता – २.२४ दशलक्ष डॉलर्स – सुमारे १९.८ कोटी रुपये
- उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ – (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) १.१२ दशलक्ष डॉलर्स – सुमारे ९.९ कोटी रुपये
हेही वाचा – IND vs AUS : पराभवानंतर संतापाचा उडाला भडका…? गौतम गंभीरचं म्हणणं शांतपणे ऐकताना दिसला सूर्या, पाहा VIDEO
ग्रुप स्टेजमधील संघांनाही दिलासा
- प्रत्येक सहभागी संघ: प्रत्येक सहभागी संघाला २.५ लाख डॉलर्स (सुमारे २.२ कोटी रुपये) मिळतील.
- सामना जिंकण्याचे बक्षीस: प्रत्येक ग्रुप मॅचच्या विजयासाठी ३४,३१४ डॉलर्स (सुमारे २८.८ लाख रुपये) दिले जातील.
- पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना: ७ लाख डॉलर्स (सुमारे ६.१ कोटी रुपये)
- सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना: २.८ लाख डॉलर्स (सुमारे २.४ कोटी रुपये)
हेही वाचा – IND vs AUS : अर्शदीपला का दिली जात नाही संधी? गौतम गंभीरच्या संघ निवडीवरून संतापला अश्विन
या विश्वचषकाने केवळ भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला नवी उंची दिली नाही, तर महिला क्रिकेटच्या आर्थिक स्तरालाही नवी दिशा दिली आहे. समान वेतन आणि विक्रमी बक्षिसाच्या रकमेमुळे हे सिद्ध झाले आहे की, आता महिला क्रिकेट केवळ खेळ नाही, तर सन्मान आणि समानतेची नवी मिसाल बनले आहे.





