मुंबई – मुंबईत दादर इथे जुन्या महापौर निवासात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते.
शिवाजीपार्क जवळ महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी हे स्मारक उभे राहणार असून त्यासाठी 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या स्मारकाच्या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूरी देण्यात आली होती. मात्र कोविड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण देऊन विरोधी पक्ष भाजपा आणि मनसेच्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित न केल्याबद्दल या पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली.
स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला.
स्मारकासाठी भूवापर आणि पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.